Maharashtra Expressway News : महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (MSRDC) लवकरच राज्यातील एका महत्त्वाच्या महामार्गाचा चेहरामोहरा बदलणार आहे. महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा असा मुंबई–पुणे एक्सप्रेसवे आता दहा पदरी (10-lane) बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास आणखी वेगवान आणि आरामदायी होणार असल्याची अपेक्षा आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरज लक्षात घेता, महामंडळाने या महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्वी हा महामार्ग आठ पदरी करण्याचा प्रस्ताव होता, मात्र आता तो दहा पदरी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे प्रकल्पावर अतिरिक्त 1,420 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, तर एकूण खर्च 14,260 कोटी रुपये इतका असेल.
प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे, आणि 2030 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मिळत आहे. हे काम हायब्रिड Annuity मॉडेल अंतर्गत करण्यात येणार असून, यात 40 टक्के निधी सरकारकडून आणि उर्वरित 60 टक्के निधी खाजगी विकासकांकडून उभारला जाईल.
सध्या हा महामार्ग 94.6 किमी लांबीचा आहे. यातील 13 किमी लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते पूर्ण होणार आहे. या महामार्गावरील टोल वसुलीचा करार सध्या 2045 पर्यंत वैध आहे, मात्र दहा पदरी विस्तारानंतर हा कालावधी आणखी वाढवला जाणार आहे.
या विस्तारामुळे मुंबई–पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट होणार असून, दोन्ही महानगरांच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल. दैनंदिन कामानिमित्ताने या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत लाभदायी ठरणार आहे.








