Husband Wife Divorce : केरळ उच्च न्यायालयाने एका महिलेच्या घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी करताना मोठं भाष्य केलं आहे. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एम.बी. स्नेहलता यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, पतीचा पत्नीवर संशय घेणे ही मानसिक क्रूरतेचे एक गंभीर स्वरूप आहे आणि हे स्वरूप वैवाहिक जीवन नरक बनवू शकते. शिवाय लग्न हे विश्वास, प्रेम आणि आदरावर आधारित असते. जेव्हा विश्वासाची जागा संशय घेतो तेव्हा नातेसंबंधांना तडा जातो.
उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या व्ही. भगत विरुद्ध डी. भगत (१९९४) या खटल्याचा हवाला देत महिलेचा घटस्फोट मंजूर केला. न्यायालयाने असे म्हटले की अशा संबंधात राहणे महिलेच्या प्रतिष्ठेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कोट्टायम कुटुंब न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळून लावली होती.
न्यायाधीश देवन रामचंद्रन आणि स्नेहलता यांनी या खटल्यात बोलताना सांगितले की, लग्न हे विश्वास, प्रेम आणि समजुतीवर आधारित असते. जर पती किंवा पत्नी एकमेकांवर सतत संशय घेत राहिले तर वैवाहिक जीवन नरक बनते. पत्नीवर वारंवार शंका घेणे आणि प्रश्न विचारणे स्वाभिमान आणि मनःशांती नष्ट करते. त्यामुळे स्त्रीचे जीवन भीती आणि तणावाने भरते. जेव्हा संशय विश्वासाची जागा घेतो तेव्हा नातेसंबंध त्याचे खरे सौंदर्य गमावून बसतो. अशा परिस्थितीत, पत्नीने नात्यात राहावे अशी अपेक्षा करणे अशक्य आहे. तिलाही मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की, पतीचे वर्तन घटस्फोट कायदा, १८६९ च्या कलम १०(१)अंतर्गत गंभीर मानसिक क्रूरता आहे. न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला, ज्यामध्ये असे म्हटले होते की विवाह विश्वास, आदर आणि भावनिक सुरक्षिततेवर आधारित आहे. जर हे सर्व संपले तर विवाह केवळ एक ओझे बनतो.
 
			








