प्रतिनिधी; मानस मते | नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाकडून संरक्षण मंत्रालयाला ११४ मेड इन इंडिया राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाची किंमत तब्बल दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ पुढील काही आठवड्यांत या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. हा करार भारत सरकारच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार ठरू शकतो.
या प्रस्तावानुसार, फ्रान्सची डसॉल्ट एव्हिएशन कंपनी भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने ही विमाने भारतातच तयार करणार असून, त्यामध्ये ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर होणार आहे. हवाई दलाकडून आलेला हा प्रस्ताव सध्या विचाराधीन असून, अंतिम निर्णयानंतर तो संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे पाठवला जाणार आहे.
सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ३६ राफेल विमाने आहेत. याशिवाय भारतीय नौदलाने देखील ३६ राफेल विमानांसाठी ऑर्डर दिली आहे. दरम्यान, राफेल विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एम-८८ इंजिनांच्या देखभाल आणि दुरुस्तीकरिता फ्रान्सने हैदराबादमध्ये विशेष मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल (MRO) केंद्र स्थापन करण्याची योजना आखली आहे. या उद्देशाने डसॉल्ट कंपनीने भारतात आधीच एक सहाय्यक कंपनी स्थापन केली आहे.