नोकरदार वर्गासाठी पदोन्नती आणि पगारवाढ ही आयुष्यातली सर्वात मोठी अपेक्षा असते. मात्र, जेव्हा मेहनतीनंतरही प्रमोशन नाकारले जाते, तेव्हा अनेकजण निराश होतात. पण, अमेरिकेतील एका महिलेने या प्रसंगाला अगदी अनोख्या पद्धतीने उत्तर दिलं. तिने असा बदला घेतला की, ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती—ती थेट आपलीच जुनी कंपनी विकत घेऊन त्या बॉसला बाहेरचा रस्ता दाखवला, ज्याने कधीकाळी तिचं स्वप्न चिरडलं होतं.
ही कहाणी आहे ज्युलिया स्टीवर्ट यांची. त्या कधीकाळी ‘Applebee’s’ या रेस्टॉरंट कंपनीच्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की, जर त्यांनी कंपनीला नफ्यात आणलं, तर त्यांना सीईओ बनवलं जाईल. ज्युलियाने टीमसह कठोर परिश्रम करून फक्त तीन वर्षांत तोट्यातील कंपनीला मोठ्या नफ्यात आणलं.
वचनभंगाचा धक्का!
मात्र, सीईओ पद देण्याची वेळ आली, तेव्हा ज्युलियाच्या बॉसने दिलेलं वचन मोडलं. कोणतंही कारण न सांगता त्यांना प्रमोशन नाकारलं. या धक्क्यानंतर ज्युलियाने कंपनीला राजीनामा दिला.
यानंतर त्यांनी ‘इंटरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक’ (IHOP) या कंपनीत प्रवेश केला. पाच वर्षांत त्यांनी IHOP ला प्रचंड यश मिळवून दिलं. नंतर जेव्हा IHOP संचालक मंडळाने नवीन कंपनी विकत घेण्याचा विचार केला, तेव्हा ज्युलियाने धाडसी सल्ला दिला – ‘Applebee’s’ खरेदी करूया!
जुन्या कंपनीच्या नव्या बॉस!
हा प्रस्ताव सर्वांनी मान्य केला आणि ‘Applebee’s’ ला तब्बल २.३ अब्ज डॉलर्स (सुमारे २०,२४३ कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्यात आलं. अशा रीतीने ज्युलिया पुन्हा आपल्या जुन्या कंपनीच्या शिखरावर विराजमान झाल्या.
पहिल्याच दिवशी त्यांनी त्या जुन्या सीईओला बाहेरचा रस्ता दाखवला—त्याच व्यक्तीला, ज्याने त्यांच्याशी वचनभंग केला होता.
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये ज्युलियाने आपली ही कथा सांगितली. सोशल मीडियावर ही कहाणी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.