पुणे निवडणुका : ग्रामपंचायतीपासून मुंबई महापालिकेपर्यंत महायुतीची सत्ता येणार – उदय सामंत

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार असून जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत, असे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ‘‘ग्रामपंचायत, पंचायत समितीपासून थेट मुंबई महापालिकेत भगवा फडकवण्याचा आमचा निर्धार आहे. किती जागा लढवायच्या हे सध्या सांगणे योग्य नाही. युती झाल्यावरच त्याची घोषणा होईल,’’ असे ते म्हणाले.

सामंत पुण्यातील सारसबागेसमोरील पक्ष कार्यालयात झालेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) संघटनात्मक बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे, किरण साळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर ते त्यांच्यासाठी चांगले आहे. मात्र सत्ता आमचीच येणार. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या उठावानंतर विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रत्येक पक्षाला स्वबळ वाढवण्याचा अधिकार आहे, पण या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत.’’

राज ठाकरे यांनी अलीकडेच चौथ्यांदा उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता सामंत म्हणाले, ‘‘त्यांच्या भेटीतून महायुतीला कोणताही फटका बसणार नाही. लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. ते बंधू एकत्र येऊन संपतीलच. कोणी चार वेळा भेटले असेल, तर मी पाच वेळा भेटलो, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. यंदाचा आमचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असून तो नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडेल.’’

अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता सामंत यांनी स्पष्ट केले, ‘‘उपमुख्यमंत्री पवार फक्त ठोस कारण असेल तेव्हाच बैठका चुकवतात. सध्या त्यांना घशाचा त्रास असल्यामुळे ते शासकीय बैठकींना अनुपस्थित आहेत. त्यांचे दौरेही रद्द झाले आहेत. त्यामुळे इतर चर्चा करण्याची आवश्यकता नाही.’’