पुणे : कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे आजपासून सुरू झालेल्या फूड अँड ॲग्री एक्स्पो २०२५ अर्थात फूड महोत्सवाला भव्य सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
१२ ते १४ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून, विविध अन्नप्रक्रिया उत्पादने, कृषी नवकल्पना, फूड व ॲग्री FMCG उत्पादने, सेवा अशा अनेक क्षेत्रातील प्रदर्शक यात सहभागी झाले आहेत.
पहिल्याच दिवशी आयोजित बिझनेस समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ते यशस्वीरीत्या पार पडले. या समिटमध्ये सेंद्रिय शेती (Organic Farming), स्टार्टअप्ससाठी निधी (Funding for Startups), फूडप्रेन्युअर्ससाठी नवीन संधी (New Opportunities for Foodpreneurs), बाजारपेठेचे संशोधन (Market Research) या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. तसेच स्वतःच्या उत्पादनाची बाजारपेठ कशी मिळवावी व वाढवावी याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
तर १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १:३० वाजता बायर–सेलर मीट आयोजित करण्यात आली आहे.
या प्रदर्शनात विविध पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. स्वादिष्ट पदार्थांसह कृषी व अन्न क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची झलक पाहण्याची ही एक अनोखी मेजवानी ठरणार आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “अन्न व कृषी क्षेत्रात नाविन्य, प्रक्रिया व विपणन यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येते. अशा प्रकारच्या प्रदर्शनातून उद्योग, शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जातो, ज्याचा फायदा सर्वांना होतो.”