पुणे : नेत्यांची वेळ न मिळाल्याने सिंहगड रोड उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

पुणे – शहरातील वाढत्या वाहतुकीला दिलासा देण्यासाठी उभारण्यात आलेले सिंहगड रस्ता उड्डाणपूल (पुणे महापालिका) आणि गणेशखिंड रस्ता उड्डाणपूल (पीएमआरडीए) पूर्णत्वास आले आहेत. मात्र अद्याप उद्‍घाटन न झाल्याने हे पूल वाहतुकीसाठी खुले झालेले नाहीत. त्यामुळे रोजच नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या उड्डाणपुलांचे उद्घाटन १५ ऑगस्टला होणार होते. पण काम अपूर्ण असल्याचे कारण देत तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. नंतर २० ऑगस्ट रोजी उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र ती तारीखही निश्चित न झाल्याने अजूनही प्रतीक्षा सुरू आहे. महापालिकेने या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ मागितली आहे, पण त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम अद्याप निश्‍चित झालेला नाही.

दरम्यान, उड्डाणपुलांवरील पथदिवे, डांबरीकरण व रंगकाम पूर्ण झाले आहे. पुलाखाली सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली असून सेवा रस्ते व पादचारी मार्गांचे काम सुरू आहे. या कामामुळे पुलाखाली वाहतूक कोंडी होत आहे.

उड्डाणपूल सुरु झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होऊन सेवा रस्त्याच्या कामालाही गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मात्र “आमची सर्व तयारी पूर्ण असून केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम कधी ठरणार याची प्रतीक्षा आहे”, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.