नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात नवे उपराष्ट्रपती कोण असतील याबाबत उत्सुकता होती. आज (१७ ऑगस्ट) भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर अखेर एनडीएने आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ही माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.
कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन?
सी.पी. राधाकृष्णन हे गेल्या तीन दशकांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. तमिळनाडूमधील कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी तमिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा काही काळ सांभाळली होती. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांना भाजपाने लोकसभेचं तिकीट दिलं होतं, मात्र ते निवडून येऊ शकले नाहीत.
फेब्रुवारी २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त केलं गेलं. आता ते एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत.
निवडणुकीचं वेळापत्रक
-
नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख : २१ ऑगस्ट २०२५
-
छाननी : २२ ऑगस्ट २०२५
-
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख : २५ ऑगस्ट २०२५
-
मतदान व मतमोजणी : ९ सप्टेंबर २०२५
धनखड यांच्या राजीनाम्यावरून चर्चा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला. अधिकृतपणे त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगितलं असलं तरी विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं का, की हा त्यांचा स्वेच्छेचा निर्णय होता, याबाबत अजूनही तर्कवितर्क सुरू आहेत.