ब्रेकिंग न्यूज मुंबई : नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूरच्या रेणापूर येथे बदली झालेल्या तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आलं आहे. निरोप समारंभादरम्यान अधिकृत तहसीलदारांच्या खुर्चीत बसून त्यांनी ‘याराना’ चित्रपटातील मैत्रीचं गाणं सादर केलं. यावेळी त्यांच्या विभागातील कर्मचारीही उपस्थित होते. थोरात यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि तो शासकीय पदाला शोभणारा नसल्याचं सांगत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली.
महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, अधिकृत पदावर असताना प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने पदाची मर्यादा, जबाबदारी आणि प्रतिष्ठा जपणं ही प्राथमिक जबाबदारी आहे. खासगी कार्यक्रमात गाणं किंवा सादरीकरणाला हरकत नसली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तनाची शालीनता आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे थोरात यांचं निलंबन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
तथापि, केवळ गाणं म्हणाल्याबद्दल तहसीलदारांवर तात्काळ कारवाई झाली, पण जालन्यातील डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. त्यांनी वर्दीत असताना आंदोलक शेतकऱ्याला सिनेस्टाईल लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांच्या वर्तनावरून जनतेपासून ते विरोधकांपर्यंत संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत विचारले असता “मी माहिती घेऊन कारवाई करतो,” एवढंच उत्तर बावनकुळे यांनी दिलं.
यामुळे आता सवाल निर्माण होतोय की, एका बाजूला गाणं गाणाऱ्या तहसीलदारांवर झटपट कारवाई होते, पण लाथ मारणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सरकार गप्प का आहे?