मोठी बातमी : हडपसरमध्ये गणेशमूर्तींची तोडफोड; प्रचंड खळबळ
पुणे : हडपसरमधील भोसले गार्डन येथे उभारण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या स्टॉलवर अज्ञातांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टॉलवरील पडदा फाडून आत घुसलेल्या अज्ञात व्यक्तींनी 10 ते 12 मोठ्या गणेशमूर्तींची मोडतोड केली. इतकेच नाही तर मूर्तींच्या आसपास अस्वच्छता आणि लघवी केल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही घटना केवळ तोडफोड न राहता धार्मिक भावना दुखावणारी असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “ही घटना अत्यंत निंदनीय असून, जाणीवपूर्वक घडवून आणलेली असावी,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून, हे कृत्य नेमके कोणाकडून आणि कोणत्या हेतूने झाले याचा शोध घेतला जात आहे.
📌 हडपसर परिसरातील हा प्रकार समोर आल्यानंतर गणेशोत्सव काळातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.