बायकोसोबत वाद; पतीनं चार मुलांसह विहिरीत उडी मारत घेतलं टोकाचं पाऊल

अहिल्यानगर (श्रीगोंदा): जिल्ह्यातील राहाता तालुक्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पत्नी नांदायला येत नसल्यामुळे नाराज झालेल्या पतीनं आपल्या चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव अरुण काळे (वय ३०, रा. चिखली कोरेगाव, श्रीगोंदा) असं असून, त्यानं प्रथम आपल्या मुलांना विहिरीत ढकललं आणि त्यानंतर स्वत:ही उडी मारली.

मृतांमध्ये चार निरागस अपत्यांचा समावेश

या दुर्दैवी घटनेत काळे यांच्या शिवानी (८), प्रेम (७), वीर (६) आणि कबीर (५) या चार मुलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उरलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. अरुण काळे यांचा मृतदेह दोरीने हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आला.

कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, काळे यांचा पत्नीशी काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यामुळे पत्नी माहेरी गेलेली होती. ती परत न आल्यामुळे नैराश्यातून काळे यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळावरील तपशील

घटनास्थळी काळे यांची मोटारसायकल शिर्डी–नगर बायपासलगत कोहाळे शिवारात उभी आढळली. ते आपल्या मुलांसह मोटारसायकलवरून येथे आले आणि नंतर विहिरीत उडी मारली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.