ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाने आंदोलनाची मागणी करणारा एक बॅनर पुण्यात लावण्यात आला आहे. या पोस्टरवर “आता तरी उठा अण्णा, मतांची चोरी झाली आहे” असा मजकूर लिहिला असून त्यावर अण्णांचा फोटो देखील आहे. या पोस्टरमुळे अण्णा भडकले आहेत. “वयाच्या 90 व्या वर्षी मीच काम करायचं आणि बाकी सगळे झोपून राहायचं का?” असा सवाल त्यांनी केला आहे.
“माझ्या आंदोलनांमुळे देशाला 10 कायदे मिळाले”
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अण्णा म्हणाले – “आतापर्यंत मी भ्रष्टाचाराविरोधात मोठी आंदोलने केली. माझ्या प्रयत्नांमुळे दहा महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आले. माहितीच्या अधिकाराचा कायदा, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल-लोकायुक्त यांसारखे कायदे हे माझ्या आंदोलनांचे फळ आहेत. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात जागृती झाली.”
“तरुणांनी आता जबाबदारी घ्यावी”
अण्णा पुढे म्हणाले – “आता माझं वय झालं आहे. मी 90 वर्षांचा असूनही काम करावं अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. आजवर मी जे केलं, ते आता तरुणांनी करायला हवं. देशाप्रती त्यांचंही कर्तव्य आहे. फक्त बोट दाखवून ‘हे करा, ते करा’ म्हणण्यात काही अर्थ नाही. तरुणांनीच आता पुढे येऊन भ्रष्टाचाराविरोधात उभं राहायला हवं.”
दरम्यान, अण्णा हजारे यांनी 2012 मध्ये दिल्लीत लोकपाल विधेयकासाठी मोठं आंदोलन केलं होतं. मात्र त्यानंतर ते सक्रिय आंदोलनांपासून दूर आहेत.