भंडारा : शहरातील मणप्पूरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरनेच खातेदाराची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या अमित जोशी यांनी थेट भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तत्काळ जोशी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असून, सध्या ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अमित जोशी यांचा मुलगा हिमांशू याने महिनाभरापूर्वी 292 ग्रॅम (सुमारे 29-30 तोळे) सोने मणप्पूरम गोल्ड लोन बँकेत गहाण ठेवून 18 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र पैशाची गरज पुढे ढकलल्याने ही रक्कम बँकेतच ठेवली होती.
दरम्यान, बँक मॅनेजर रोहित साहू याने जोशी यांच्या खात्यातील 18 लाख रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात वळवून फसवणूक केली. त्यानंतर तो गायब झाला. वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शंका बळावली.
18 ऑगस्ट रोजी जोशी यांनी भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर साहूविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 316 (2) व 318 (4) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मात्र अद्यापही फसवलेले पैसे परत न मिळाल्याने आणि न्याय न मिळाल्याच्या संतापातून जोशी यांनी आज टोकाची भूमिका घेतली. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.