१५० पेक्षा जास्त ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती कचऱ्यात फेकण्याचे मोठे षडयंत्र; हिंदू समाजात तीव्र संताप !

सरकारने तातडीने जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत  – हिंदु जनजागृती समितीची मागणी

     यंदा गणेशोत्सवाला राज्य शासनाने त्याला ‘राज्य महोत्सवाचा’ दर्जा दिला आहे; मात्र ठाणे जिल्ह्यातील डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गणेशमूर्ती ठेवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. हा अवमानकारक प्रकार समाजातच ग्रामस्थांनी दिडशेपेक्षा जास्त डंपर मूर्त्यांसह परत न्यायला भाग पाडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून संपूर्ण हिंदू समाजाच्या धार्मिक भावना यामुळे तीव्रतेने दुखावल्या आहेत. यापैकी बऱ्याच ट्रकवर ‘Vechile on BMC duty’ असे असल्याने या गाड्या मुंबई महापालिकेच्या असण्याची दाट शक्यता आहे. गणेशोत्सव हा हिंदूंचा अतिशय श्रद्धेचा उत्सव असून श्रीगणेशमूर्तीची अवमानना ही कोणत्याही हिंदूस असह्य आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

     यापूर्वीच हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, तसेच महाराष्ट्रभरातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गणेशमूर्ती कचऱ्याच्या गाडीत नेऊ नयेत, कृत्रिम हौदात विसर्जन झालेल्या गणेशमूर्तींची कर्मचाऱ्यांनी विटंबना होऊ नये, त्या मूर्ती कचऱ्या, निर्जनस्थळी वा खाणीत टाकू नये यासाठी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. तरीदेखील प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न करता हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालणारे हे गंभीर दुष्कृत्य घडवून आणले आहे.

     गणेशमूर्ती विसर्जनाबाबत मा. न्यायालय व महाराष्ट्र शासन यांचे काही आदेश आहेत; मात्र त्याचा अर्थ हा नाही की भगवान श्रीगणेशाचा अवमान, अनादर करावा, हे प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे. हिंदु धर्मशास्त्रानुसार श्री गणेशाचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यास सांगितले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरणाचा अधिकार आहे, त्याचा शासनाकडून भंग होत आहे.

     हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे आग्रही मागणी आहे की, कचऱ्याच्या गाडीतून गणेशमूर्ती नेण्याचा प्रकार थांबवून त्यासंबंधी तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करताना कर्मचाऱ्यांकडून होणारी मूर्त्यांची विटंबना त्वरित रोखावी. हिंदूंच्या धार्मिक भावना कुठल्याही प्रकारे दुखावल्या जाणार नाही, हे खबरदारी शासनाने घेतली पाहिजे. आगामी विसर्जनावेळी अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने कठोर निर्देश राज्यभरात जारी करून त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी घ्यावी.