भगवा, सनातन आणि हिंदु : मूळ एकच .
प्रस्तावना : नुकताच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला आणि न्यायालयाने या प्रकरणात गोवण्यात आलेल्या निरपराध हिंदूंची निर्दोष मुक्तता केली. या घटनेमुळे काँग्रेसने जाणीवपूर्वक रूढ करण्याचा प्रयत्न केलेल्या ‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘हिंदु आतंकवाद’ या षड्यंत्राचा बुरखाफाड झाला. नसानसांत हिंदुद्वेष भिनलेल्या काँग्रेसींना या निकालामुळे दुःख होणे स्वाभाविक होते. त्यांची खदखद ‘सनातनी दहशतवाद’ या शब्दप्रयोगाने पुन्हा एकदा बाहेर पडली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भगवा दहशतवाद’ नसला, तरी ‘सनातन दहशतवाद’ मात्र आहेच’, अशा आशयाचे वक्तव्य केले. त्याचीच ‘री’ पुढे ओढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच आहेत’, अशी गरळओक केली. या दोन्ही वक्तव्यांवरून ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ या वाक्प्रचाराची सत्यता कळते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘काँग्रेसमुक्त भारता’चा का पुरस्कार करतात, हेही लक्षात येते.
काँग्रेसचा हिंदुद्वेष : ‘भगवा आतंकवाद’ या शब्दाचा फोलपणा राष्ट्रीय पातळीवर सिद्ध झाल्यानंतर आता या शब्दाचे जनक असणारे काँग्रेसी एक पाऊल मागे आले. पृथ्वीराज चव्हाणांना आता उपरती होत आहे की, भगवा रंग हा वारकरी संप्रदायाचा, स्वातंत्र्यलढ्याचा रंग आहे. मग जेव्हा काँग्रेस ‘भगव्या आतंकवादा’ची खोटी ‘थिअरी’ लिहित होती, तेव्हा त्यांनी त्यांची बुद्धी कुठे गहाण ठेवली होती ? तेव्हा त्यांना भगवा रंग पवित्रतेचे प्रतिक आहे, हे माहीत नव्हते का ? जेव्हा त्यांच्यावर टीकेची झोड उठली, तेव्हा त्यांनी ‘सनातन धर्म नाही, तर सनातन संस्था दहशतवादी असून संस्थेवर बंदी घालायची आहे’, असे म्हटले. ‘कुत्र्याचे शेपूट वाकडेच का असते’, याचे उत्तर चव्हाणांच्या हिंदुद्वेषी मानसिकतेत मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात मोहनदास गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले, २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाच्या वेळी पुण्यातील ब्राह्मणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मालेगावच्या वेळी अभिनव भारतला लक्ष्य केले आणि आज ते सनातन संस्थेला लक्ष्य करत आहेत. हिंदु धर्माला किंवा किमान हिंदुत्वनिष्ठ संघटनांना किंवा व्यक्तींना, नेत्यांना तरी लक्ष्य करूया, या मानसिकतेतून काँग्रेसी आणि साम्यवादी कार्यरत आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, कर्नाटक येथे हिंदुत्वनिष्ठांचे ‘सर तन से जुदा’ होत असतांना काँग्रेसींना कुठल्या आतंकवादाचा प्रत्यय येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये त्यांनी आतंक दिसतो ! सनातन संस्था हिंदु धर्मप्रसाराचे दैदिप्यमान कार्य करत आहे. संस्थेचे सर्व कार्य कायद्याच्या चौकटीत राहून चालते. त्यामुळे सनातनवर बंदी येण्यासाठी प्रयत्न करणे, हा हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याचाच एक भाग आहे. तरी बरे, काँग्रेसच्याच केंद्र सरकारने वर्ष २०१२-१३ मध्ये सनातन संस्थेवर बंदी घालू शकत नाही, असे स्पष्ट केले. आसुरी शक्ती कितीही बलाढ्य असल्या तरी धर्माचे कार्य करणार्यांच्या पाठिशी साक्षात् भगवंत असतो, याची ही प्रचिती म्हणावी लागेल.
मध्यंतरी काँग्रेसी नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ‘पक्षाच्या आदेशावरून ‘भगवा दहशतवाद’ शब्द वापरला; मी तो शब्द वापरायला नको होता. तो चुकीचा होता’, अशी कबुली दिली होती. काँग्रेस पक्षात हिंदुहनन करण्याची ‘स्क्रीप्ट’ लिहिली जायची आणि काँग्रेसी नेते त्याचे सादरीकरण करायचे, याची साक्ष या कबुलीतून पटते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदुद्वेष पसरवणारे डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘या हत्येमागे गोडसेवादी प्रवृत्तींचा हात असू शकतो’, हे केलेले ‘स्टेटमेंट’ही याच ‘स्क्रीप्ट’चा भाग असणार, हे वेगळे सांगायला नको. मालेगाव बॉम्बस्फोटातही आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नावे दडपशाहीने वदवून घेतली जावीत, यामागे कुणाचा ‘हात’ होता, याचा अंदाज बांधणे हिंदु समाजाला कठीण नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना ‘भगवा’ हा रंग पवित्र असल्याची उपरती होणे, हा त्यांच्या ‘डॅमेज कंट्रोल’चा भाग असू शकतो. अर्थात् अशांनी कितीही सारवासारव किंवा शब्दच्छल केला, तरी हिंदुविरोधी वृत्तीचे मांडलिक असणार्यांची नस हिंदु समाजाने ओळखली आहे.
सनातन, हिंदु , वैदिक, आर्य आणि भगवा यांचे मूळ एकच : ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’ आज भारताची शक्ती कमी करण्यासाठी हिंदुत्वावर प्रहार करत आहेत. ‘हिंदु-हिंदुत्व वेगळे आहे’, असे वक्तव्य असो, ‘आर्य बाहेरून आले’, असे वक्तव्य असो किंवा ‘मी अपघाताने हिंदु आहे’, हे वक्तव्य असो ! या वक्तव्यांचा उद्देश हिंदूंच्या आणि भारताच्या विभाजनाचा आहे. हिंदूंच्या दृष्टीने सनातन, हिंदु, वैदिक, आर्य हे सगळे शब्द समानार्थी आहेत. सनातन धर्म म्हणजे हिंदु धर्म म्हणजेच आर्य आणि वैदिक धर्म ! आर्यांच्या ध्वजाचा रंग केशरी म्हणजे भगवा आहे. सकल विश्वाचे कल्याण हेच ब्रीद असलेल्या ऋषीमुनींच्या वस्त्रांचा रंगही भगवाच आहे. त्यामुळे काँग्रेसींनी भगवा आणि सनातन यांमध्ये भेद करण्याचा प्रयत्न करणे, हे हिंदुविरोधी ‘स्क्रीप्ट’चेच एक कथानक आहे. ‘भगव्या दहशतवादा’च्या षड्यंत्राला नेस्तनाबूत करायचे असेल, तर हिंदुविरोधकांना भारत आणि हिंदू यांच्या विरोधात कारस्थाने करण्याचा विचारही येणार नाही, अशी दहशत किंवा वचक निर्माण करणे हे हिंदूंचे कर्तव्य ठरते.
थोडक्यात, काँग्रेसींना ‘गझवा-ए-हिंद’ हवे असले, तरी कालमाहात्म्यानुसार भारत ‘भगवा-ए-हिंद’ अर्थात् हिंदु राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. त्या वेळी भगव्याला विरोध करणार्यांची नावे काळ्या अक्षरांत, तर सनातन धर्माच्या बाजूने लढणार्यांनी नावे सुवर्णाक्षरात लिहिली जातील, हे निश्चित !
संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.