Uddhav Thackeray and Raj Thackeray : मुंबई : त्रिभाषा धोरणाविरोधात लढा देणाऱ्या मराठी जनतेच्या विजयाच्या निमित्ताने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) संयुक्त विजयी मेळावा आज (5 जुलै) मुंबईच्या वरळी डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोघेही तब्बल 18 वर्षांनंतर एकाच मंचावर एकत्र दिसणार असून, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता यामुळे वाढली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे आज सकाळी 11.30 वाजता वरळी डोमवर पोहोचतील. डोम परिसरात जोरदार तयारी सुरू असून, संपूर्ण परिसर भगव्या रंगात सजवण्यात आला आहे. सुमारे 8 हजार क्षमतेच्या डोममध्ये व्हीआयपी रांगा नियोजित करण्यात आल्या आहेत. मराठी अस्मितेचे प्रतिनिधित्व करणारे फलकही डोम परिसरात मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.
या विजयी मेळाव्यात महत्त्वाचे राजकीय नेते भाषण करणार आहेत. प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे (Supriya Sule), राज ठाकरे आणि अखेरचे भाषण उद्धव ठाकरे यांचे असणार आहे. तसेच, जर काँग्रेसचे काही नेते उपस्थित राहिले, तर त्यांनाही भाषणाची संधी दिली जाणार आहे.
मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वरळी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत. हाजी अली आणि वरळीकडे जाणारे काही मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता असून, डोमच्या बाहेर मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत, जेणेकरून गर्दीतील लोकांना भाषणं ऐकता येतील.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एक पत्रक प्रसिद्ध करत मराठी जनतेला भावनिक साद घातली आहे. ‘आवाज मराठीचा…’ असं म्हणत त्यांनी म्हटलंय. ‘सरकारला नमवलं का? तर हो! कोणी नमवलं? तर मराठी जनांनी नमवलं… आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष केला. त्यामुळे, आनंद साजरा करताना आम्ही आयोजक आहोत, पण जल्लोष तुमचा आहे! वाजत-गाजत या, गुलाल उधळत या… आम्ही वाट पाहत आहोत!’
या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू काय बोलणार, पुढील युती किंवा सहकार्याबाबत काही संकेत देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठी अस्मितेच्या प्रश्नावर एकत्र आलेले हे दोन बंधू राज्यातील आगामी राजकारणात कोणते नवे वळण आणतील, हे आजच्या भाषणांवरून स्पष्ट होईल.