Thai monk Scandal
बँकॉक : थायलंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बौद्ध भिक्षूंना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवून आणि त्याचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने गेल्या तीन वर्षांत अनेक भिक्षूंना धमकावून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे थायलंडच्या बौद्ध धर्माला मोठा धक्का बसला आहे.
कसे उघडकीस आले प्रकरण?
पोलिसांनी या महिलेला “मिस गोल्फ” असे सांकेतिक नाव दिले आहे. तिने आतापर्यंत किमान नऊ बौद्ध भिक्षूंना आपले शिकार बनवले. ती भिक्षूंशी जवळीक साधून त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायची. या कृत्याचे गुपचूप फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायची. नंतर हेच फोटो आणि व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करायची आणि पैशांची मागणी करायची.
या ब्लॅकमेलिंगमधून तिने सुमारे १०० कोटी रुपये उकळल्याचे थायलंड पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणाची सुरुवात २०२४ च्या मे महिन्यात झाली. ‘मिस गोल्फ’ने एका प्रमुख भिक्षूशी संबंध ठेवून गर्भधारणेचा बनाव केला आणि १ कोटी ६८ लाख रुपयांची मागणी केली.
बँकॉकच्या एका मोठ्या मठाच्या या प्रमुखाने अचानक भिक्षूपद सोडले. चौकशी केली असता, त्यांना एका महिलेकडून खंडणीसाठी धमकावले जात असल्याचे समोर आले. अधिक तपास केल्यानंतर उघड झाले की, फक्त एकच नाही तर अनेक भिक्षूंनी तिला पैसे ट्रान्सफर केले होते. याच पद्धतीने तिने ‘modus operandi’ तयार केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तपासात मिळाले धक्कादायक पुरावे : पोलिसांनी मिस गोल्फच्या घरावर छापा टाकला असता, ८०,००० हून अधिक फोटो आणि व्हिडीओ सापडले, जे ती ब्लॅकमेलिंगसाठी वापरत होती. थायलंडमधील अनेक प्रमुख भिक्षूंचे यामध्ये व्हिडीओ आहेत.
थायलंडच्या बौद्ध धर्मावर मोठे संकट : थायलंडमध्ये ९० टक्के पेक्षा जास्त लोक बौद्ध धर्मीय आहेत आणि ते भिक्षूंना देवाप्रमाणे मानतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भिक्षूंच्या गैरवर्तनाच्या घटनांमुळे या संस्थेच्या प्रतिमेला तडा जात आहे. पोलिसांनी सामान्य नागरिकांसाठी एक हॉटलाइन सुरू केली आहे, जिथे ते गैरवर्तन करणाऱ्या भिक्षूंबद्दल तक्रार करू शकतात.
बौद्ध धर्माची सर्वोच्च संस्था ‘संघ परिषद’ आता भिक्षूंसाठीचे नियम अधिक कडक करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करणार आहे. थायलंडचे राजे वजिरालोंगकोर्न यांनी नुकताच ८१ भिक्षूंना दिलेल्या उच्च पदव्या रद्द केल्या आहेत. भिक्षूंच्या गैरवर्तनामुळे बौद्ध धर्मीयांना खूप दुःख होत असल्याचे त्यांनी म्हटले.