पती असताना परपुरुषाशी…! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

नवी दिल्ली | “विवाहित असताना परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे, हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो,” असे स्पष्ट शब्दांत सांगत सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेला फटकारले. संबंधित महिलेनं एका पुरुषाविरुद्ध बलात्काराचा आरोप करत अटकपूर्व जामिनास विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तिचे युक्तिवाद फेटाळून आरोपीला दिलेला जामिनाचा निर्णय योग्य ठरवला.

न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही सुनावणी करताना महिलेच्या वर्तनावर सवाल उपस्थित केला. “तुम्ही विवाहित आहात, दोन मुलींच्या आई आहात. तुम्ही परिपक्व आहात आणि संबंधांची गंभीरता समजून घेण्याचं वय तुमचं आहे. तरीदेखील विवाहित असताना दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवले,” असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले.

महिलेचा युक्तिवाद होता की, संबंधित व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत तिला फसवले आणि शारीरिक संबंध ठेवले. मात्र घटस्फोटानंतर त्याने लग्नास नकार दिला. यावर न्यायालयाने विचारले की, “तो तुम्हाला हॉटेलमध्ये बोलवत होता, हे खरे असले तरी तुम्ही वारंवार का जात होतात?”

पाटणा उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनाच्या निर्णयाविरोधात महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केलं की, घटस्फोटानंतर दोघांमध्ये कोणताही संबंध झाला नसल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे.

२०१६ साली सोशल मीडियावरून ओळख झालेल्या या प्रकरणात, न्यायालयाने महिलेला यथोचित जबाबदारीची जाणीव करून दिली. विवाहित असतानाही परपुरुषाशी संबंध ठेवणे हे स्वतःमध्ये गंभीर आहे, आणि अशा संबंधांतून नंतर आरोप केले गेले तरी ते न्याय्य मानले जाऊ शकत नाहीत, असा स्पष्ट संकेत पीठाने दिला.