पुणे : तिरुपतीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी ते तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेमुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.
गाडी क्रमांक 07637 ही तिरुपतीहून प्रत्येक रविवारी पहाटे 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 वाजता साईनगर शिर्डी येथे पोहोचेल. ही विशेष सेवा 3 ऑगस्टपासून 28 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार असून एकूण 9 फेऱ्या घेण्यात येतील.
त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 07638 ही साईनगर शिर्डीहून दर सोमवारी रात्री 7.35 वाजता निघेल आणि बुधवारी पहाटे 1.30 वाजता तिरुपतीला पोहोचेल.
या विशेष गाड्यांना कोपरगाव, मनमाड जंक्शन, अंकाई, नगरसोल, जालना, सेलू, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, उडीराबाद, सत्तेनापल्ले, तेनाली जंक्शन, चिराळा, ओंगोल, नेल्लोर, गुडूर जंक्शन आणि रेनिगुंटा या स्थानकांवर थांबे असणार आहेत.
ही सेवा खास करून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी निघणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे दोन्ही शहरांमधील धार्मिक पर्यटनासही मोठा चालना मिळण्याची शक्यता आहे.