गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी घेतला आहे.
मात्र, यंदाचा जुलै महिना संपत आला तरी अनेक महिलांच्या खात्यात अद्याप हप्ता जमा झालेला नाही. उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होणार असतानाही, 1500 रुपयांची वाट पाहणाऱ्या महिलांचे धैर्य आता संपत आले आहे.
दरम्यान, योजनेशी संबंधित एक सकारात्मक अपडेट समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा हप्ता एकत्र म्हणजेच 3000 रुपये लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही रक्कम रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मिळणार असल्यामुळे सरकारकडून बहिणींना एकप्रकारे सणाची भेटच मिळेल, असे बोलले जात आहे.
याबाबत अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने यापूर्वी जाहीर केले होते की, दरमहा अनुदान हे महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जमा होईल, त्यामुळे यंदा बहिणींना राखीच्या सणासाठी दुहेरी आनंद मिळू शकतो.
सद्यस्थितीत, या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक गैरप्रकारही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच 14 हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले होते. हे पुरुष 10 महिन्यांपर्यंत दरमहा 1500 रुपये मिळवत होते, ज्यामुळे सरकारला 21 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
याशिवाय, 1.6 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी महिला आणि पुरुषांची तपासणी करण्यात आली असता, 2 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक महिलांनी 6वा आणि 7वा वेतन आयोगाचा पगार घेत असतानाही योजना लाभ घेतला. ही योजना गरीब महिलांसाठी असतानाही, काही सरकारी कर्मचारी महिलांनी पैशांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने आता या गैरप्रकारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गैरवापर केलेली रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल केली जाणार असून, याप्रकरणी कठोर पावले उचलली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.