पुणे : “भारताची पारंपरिक संस्कृती ही स्त्रियांच्या सहनशीलतेने, त्यागातून टिकून आहे. सावळ्या रामचंद्राच्या तीन अनुजांसारखीच, आमच्या स्त्रियांनी कोणतीही तक्रार न करता आपले घर-संसार सांभाळला. अशाच परंपरेतील होत्या स्व. उर्मिलाताई कराड. पूर्वीच्या काळात स्त्रिया शिक्षणात मागे असल्या, तरी बुद्धीमान आणि सृजनशील होत्या. त्यांनी परिवारासाठी केलेल्या त्यागामुळेच पुरुषांना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करता आला आणि त्यांच्या जीवनात वैभवाचे क्षण आले,” असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
त्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे उभारण्यात आलेल्या ‘उर्मिलाताई कराड सभागृहाच्या’ अनावरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमात एमआयटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पद्मश्री सिने पत्रकार भावना सोमाया, कवी इंद्रजीत भालेराव, प्रा. डॉ. मंगेश कराड, तुळशीराम कराड, काशीराम कराड, प्रा. डॉ. राजेश एस., सौ. ज्योती ढाकणे, डॉ. सुचित्रा नागरे, सौ. पुनम नागरगोजे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
उर्मिलाताईंच्या आठवणींना उजाळा
डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या, “स्व. उर्मिलाताई कराड यांची शांताबाई शेळके यांच्या घरी, आळंदी येथे अनेक वेळा भेट झाली होती. त्यांच्या कविता मातृत्व, प्रेम, आणि वारकरी परंपरेची शिकवण यांचे सुंदर प्रतिबिंब आहेत. आज या भव्य सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्या आपल्या सगळ्यांच्या आठवणींमध्ये चिरंतन जिवंत राहतील.”
स्व. उर्मिलाताई म्हणजे त्यागाचे मूर्तिमंत रूप – डॉ. मंगेश कराड
कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, “उर्मिला काकी म्हणजे त्यागाचा मूर्तिमंत आदर्श. त्यांनी संपूर्ण घर जबाबदारीने सांभाळत असताना ९ पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या आशीर्वादामुळेच आमचा संपूर्ण परिवार भरभराटीच्या मार्गावर आहे. हे सभागृह त्यांच्या कार्याचे व जीवनमूल्यांचे स्मरण सतत ठेवणारे केंद्र बनेल.”
भावना सोमायांचा गौरवोद्गार आणि काव्याचा भावनिक स्पर्श
पद्मश्री भावना सोमाया यांनी सभागृहाच्या स्थापत्यशैलीचे कौतुक करत उर्मिलाताईंच्या कार्याचा गौरव केला.
ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी स्त्रियांच्या त्यागाचे कवितेतून रसाळ वर्णन केले आणि स्वतः रचलेली उर्मिलाताईवरची कविता सादर करत संपूर्ण सभागृहाला भावूक केले.
‘फेरवेल कराची’ पुस्तकाचे प्रकाशन
याच वेळी भावना सोमायांच्या फाळणीवर आधारित ‘फेरवेल कराची’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वशांती प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक डॉ. वि.दा. पिंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अशोक घुगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
✦ पुण्याच्या वैभवात भर घालणारे सभागृह – प्रा. डॉ. कराड
“राज कपूर यांच्यासाठी प्रिय असलेली ही विश्वराजबाग आता विद्येचे, कलाचे आणि तंत्रज्ञानाचे प्रतीक बनली आहे. हे सभागृह स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना असून पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालणारे ठरेल,” असे गौरवोद्गार प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी काढले आणि एमआयटी व्यवस्थापनाचे यशस्वी कार्याबद्दल अभिनंदन केले.