Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाखो महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे १२ हप्ते वितरित झाले असून, जुलै महिन्याचा हप्ता येत्या २ ते ३ दिवसांत खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
महिला व बाल विकास विभागाने ३० जुलै रोजी २,९८४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल, अशी माहिती समोर आली आहे.
या योजनेसाठी सरकारने २८,२९० कोटी रुपयांची तरतूद केली असून, ती जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी बनावट लाभार्थ्यांवर कारवाईची माहिती दिली आहे. २६.३४ लाख अपात्र अर्जदारांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे उघड झाले असून, त्यांचा लाभ जून २०२५ पासून तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
तपासणीसाठी ही प्रकरणं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून, जे अर्जदार पात्र ठरतील त्यांना पुन्हा लाभ सुरू केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुमारे २.२५ कोटी पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे.