बॅटरीत जागतिक नेतृत्व करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व उत्पादनाचे व्यावसायिकरण महत्त्वाचे ठरणार

पुणे, दिनांक २४हरित ऊर्जा केवळ चांगले जग निर्माण करण्यासाठी नाही तर जगाच्या हिताच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे. याबाबतच्या पायाभूत सुविधांवर काम होत असून अधिक संशोधन पुढे येत आहे. बॅटरीचे आयुष्य संपल्यानंतर त्याच्या पुनर्वापरावर देखील विचार केला गेला पाहिजे. जगात लिथियमची कमतरता असली तरी सोडियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा देखील बॅटरीमध्ये वापर करण्यावर संशोधन सुरू आहे. भारताला बॅटरी क्षेत्रात जागतिक नेतृत्व करायचे असेल तर त्यात नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे व्यावसायिकरण महत्त्वाचे ठरणार आहे, अशा विश्वास बॅटरी क्षेत्राशी संबंधित विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला.

हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी “इमर्जिंग बॅटरी टेक्नॉलॉजीज: इंडियन कॉन्टेक्स्ट फॉर कमर्शियलायझेशन” ही दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद २४ व २५ जुलैला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (आयआयएसईआर) येथे आयोजित करण्यात आली आहे. परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात एआरएआय पुणेचे संचालक व एसएई इंडियाचे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई, आयआयएसईआरचे संचालक प्रा. सुनील भागवत, केपीआयटीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी पंडित, केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सल्लागार व प्रमुख शास्ज्ञज्ञ डॉ. अनीता गुप्ता, एलडब्ल्यूटी ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत मराठे, आरआयएसई, टीसीजी क्रेस्टचे संचालक आणि आयआयएसईआरचे प्रा. सतीशचंद्र ओगले सहभागी झाले होते.

एसएई इंडिया, आयआयएसईआर, एआरएआय, विग्यानदीप फाऊंडेशन, एलडब्ल्यूटी, टीसीजी स्क्रीट आणि टेक्नोव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.

डॉ. रवी पंडित म्हणाले, “सध्या लिथियम बॅटरीचे युग आहे. मात्र आम्ही त्याबाबत पर्याय शोधत आहोत. या संशोधनातून अधिक चांगले करता आले तर बॅटरी क्षेत्राचे भविष्य बदलणार आहे. चीन याबाबत खूप पुढे आहे. बॅटरी क्षेत्राशी निगडित नवीन तंत्रज्ञान आणि तिचे व्यावसायिकरण या दोन वेगळ्या बाबी असून दोन्हींकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. ध्येयधोरण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राने मिळून काम केले तर या क्षेत्रात आपल्याला आंतरराष्ट्रीय नेतृत्व मिळू शकते. सरकार देखील याबाबत प्रयत्नशील असल्याचे दिसते”.

डॉ. गुप्ता म्हणाल्या, “वाढत्या लोकसंख्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करत आहोत. ते कमी करण्यासाठी अनेक प्रकारे संशोधन सुरू आहे. पर्यायी ऊर्जेच्या दृष्टीने पायाभूत सुविधांवर काम होत आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि बदलते तंत्रज्ञान विचारात घेता आणखी संशोधन होणे गरजेचे वाटते”.

रेजी मुथायी म्हणाले, “बॅटरी संशोधनात केवळ एकच बाब महत्त्वाची नसून त्यात अनेक मुद्दे आहेत. बॅटरीचे आयुष्य संपल्यानंतर त्याचा पुनर्वापर करण्यावर देखील सक्षम संशोधन व्हावे. ध्येयधोरण ठरवणारे अधिकारी, विविध विद्यापीठे आणि उद्योग क्षेत्र या सर्वांनी मिळून काम केल्यास योग्य ते उत्पादन समोर येईल. त्यानंतर त्याच्या व्यावसायिक वापरावर भर द्यावा. आपण देखील या क्षेत्रात आता पुढे जात असून आपले अवलंबित्व कमी होत आहे”.

प्रा. भागवत म्हणाले, “समाजाचा विकास ऊर्जेशी निगडित आहे. मात्र दुर्दैवाने ऊर्जेचे स्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे अक्षय ऊर्जा स्त्रोतांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या ऊर्जा क्षेत्रातून निर्माण झालेली ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी हा एकच पर्याय आहे. सध्या बॅटरीमध्ये लिथियम हा महत्त्वाचा घटक असून त्याचे उत्पादन भारतात होत नाही. मात्र सोडियम जगभरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याबाबत संशोधन सुरू असून त्यात यश मिळाल्यास ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत”.

ओगले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले, “बॅटरीबाबत आपल्या देशात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. बॅटरीमध्ये आपण आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारी पातळीवर देखील गतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात आपण नक्कीच लवकर यश मिळवणार आहोत. या परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील परस्पर सहकार्य वाढवण्याचा उद्देश आहे. जेणेकरून आपण ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे पुढे जाऊ शकतो”.

परिषदेचे सूत्रसंचालन अपर्णा देशपांडे यांनी केले. मोहन पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय निबंधे, केशव ताम्हणकर, प्रकाश सरदेसाई, शामसुंदरा व अरणकल्ले यांचे योगदान लाभले.

बॅटरी तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकीकरणावर भर:
या परिषदेमध्ये देशातील आघाडीचे शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योग तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि उच्चशिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. परिषदेमध्ये बॅटरी तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण, स्वदेशी संशोधनाचे महत्त्व आणि देशातील ई-मोबिलिटी क्रांतीला चालना देणाऱ्या नव्या तंत्रज्ञानांवर सखोल चर्चा झाली. देशभरातील तांत्रिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

या विषयांवर झाली चर्चा

– सोडियम आयन बॅटऱ्यांचे संशोधन व व्यावसायिकीकरण

– ईव्ही क्षेत्रासाठी नवनवीन बॅटरी साहित्य आणि व्यवस्थापन प्रणाली

– ऊर्जा साठवण क्षमतेसाठी भारतीय धोरणे व गुंतवणूक संधी

– संशोधन व विकास आणि स्टार्टअप यांच्यातील सहकार्याचे महत्त्व.