वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आदी सर्व हिंदुत्वनिष्ठांना निर्दोष मुक्त केले, अखेर न्यायदेवतेच्या मंदिरात पुन्हा एकदा ‘सत्याचा विजय’ झाला. धर्मनिष्ठेचा विजय झाला. हा निर्णय हिंदु समाजासाठी ऐतिहासिक आहे. सनातन संस्था या सर्व निर्दाेष मुक्त झालेल्या राष्ट्रनिष्ठांचे मन:पूर्वक अभिनंदन करते. या निर्णयाने केवळ अन्याय दूर झाला नाही, तर ‘हिंदु दहशतवाद’ प्रचलित करण्याचे षड्यंत्रही खोटे ठरले आहे. आज हिंदुत्वनिष्ठांची निर्दाेष मुक्तता झाली आहे; परंतु जोवर हिंदूंना गोवणार्या, खोटे पुरावे सादर करणार्या आणि साध्वीजींसह सर्वांवर कारागृहात अनन्वित अत्याचार करणार्या षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा होत नाही, तोवर संपूर्ण न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर केली आहे.
श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले की, निर्दाेष मुक्त झालेल्या हिंदूंना ‘भगवा दहशतवाद’ व ‘हिंदु आतंकवाद’ या खोट्या आरोपांचा कलंक झेलत अनेक वर्षे अन्यायकारकपणे तुरुंगवास भोगला. या प्रकरणात तत्कालीन तपास यंत्रणांनी अत्यंत पक्षपाती आणि पूर्वग्रहदूषित भूमिका घेतली होती. विशेषतः तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी परमवीर सिंह आणि त्यांच्यासारख्या अधिकार्यांनी राजकीय दबावाखाली खोटे पुरावे तयार केले. निर्दोष व्यक्तींना जबरदस्तीने गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तत्कालीन काँग्रेसी नेते दिग्विजय सिंह, पी. चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द प्रचलित करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. २००९ मध्ये याच काँग्रेसने मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना षड्यंत्रपूर्वक गोवले आणि २०१३ मध्ये मा. न्यायालयाने सनातनच्या सर्व साधकांना निर्दाेष मुक्त केले, तद्वतच २००८ मध्ये षड्यंत्रपूर्वक गोवलेल्यांना तब्बल १७ वर्षांनी मा. न्यायालयाने सर्वांना निर्दाेष मुक्त केले. हिंदु समाजाला आतंकवादी ठरवण्याचे पाप काँग्रेसने केले; पण न्यायदेवतेने हिंदु समाजाला न्याय दिला, असेही श्री. वर्तक म्हणाले.