लग्न ठरले होते, पण… साखरपुडा होण्याआधीच रोशनीला मृत्यूने गाठले

डोंबिवली – अहमदाबाद येथील विमान अपघातात डोंबिवलीतील रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमानात क्रू-मेंबर म्हणून कार्यरत असलेली रोशनी लवकरच आयुष्यातील नव्या पर्वात प्रवेश करणार होती. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिचा साखरपुडा, तर फेब्रुवारी-मार्चमध्ये विवाह ठरलेला होता.

विवाहासाठी हॉलच्या शोधाशोधीसुद्धा सुरुवात झाली होती. मात्र नियतीने तिच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. या अपघातामुळे सोनघरे कुटुंबियांसह संपूर्ण मित्र-परिवार शोकसागरात बुडाला आहे.

सोनघरे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील असून नोकरीनिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले आहे.

शालेय जीवनातच रोशनीने हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पाहिले होते. आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे स्वप्न पूर्णही केले. सुरुवातीला दोन वर्षे स्पाइसजेटमध्ये काम केल्यानंतर तिने एअर इंडिया कंपनीत क्रू-मेंबर म्हणून प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच ती गावाला जाऊन आली होती.

Horoscope Today 14 June 2025 in Marathi : आज, १४ जून २०२५ रोजी, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार तुमच्या दिवसाची सुरुवात कशी असेल आणि तुमच्या नशिबात काय?

२२ मे २०१० रोजी मंगळूर येथे झालेल्या विमान अपघाताची आठवणही या दुर्घटनेने ताजी केली आहे. त्या दुर्घटनेत १६६ पैकी १५८ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये डोंबिवलीच्या तेजल कामूलकर या केबिन क्रू सदस्याचाही समावेश होता. आणि आज, १५ वर्षांनी, रोशनी सोनघरे या आणखी एका डोंबिवलीकर हवाईसुंदरीने जीव गमावला.

कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी असलेल्या रोशनीच्या अचानक जाण्याने तिच्या आई-वडील आणि भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादकडे रवाना झाले. एअर इंडियाने अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांसाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती.

रोशनीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात आले असून, त्याचे अहवाल येण्यासाठी ७२ तास लागतील, अशी माहिती तिचे काका दत्ता सोनघरे यांनी दिली.