IMD weather forecast : पुढील २४ तास धोक्याचे, ६ जिल्ह्यांना हाय अलर्ट, पावसाबाबत IMD चा नवा अंदाज

IMD weather forecast : यंदा राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, तब्बल 12 दिवस आधीच मान्सूननं महाराष्ट्रात एन्ट्री केली होती. दरवर्षी साधारणपणे 7 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो, मात्र यंदा मान्सून वेळेपूर्वीच 12 दिवस आधी म्हणजे 25 मे रोजी राज्यात दाखल झाला.

त्यानंतर चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतीला देखील विलंब झाला. मात्र त्यानंतर काही दिवस पावसानं उघडीप दिली होती.

पावसानं उघडीप दिल्यामुळे पेरणीपूर्व मशागतील वेग आला, मशागतीची कामं आटपून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते, अखेर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसानं महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. दुसरीकडे आता पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Raja Raghuvanshi Murder : राजानंतर सोनम आणखी एक मर्डर करणार होती… कोण होतं टार्गेटवर? खतरनाक प्लानने पोलीस चक्रावले

राज्यात पावसाचं पुनरागमन झालं आहे, अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आता पुढील 24 तासांमध्ये हवामान विभागाकडून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोल्हापूर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज दिवसभर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं. अखेर सायंकाळच्या सुमारास मुंबई आणि काही ठिकाणी उपनगरांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. काही काळ झालेल्या पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे सांगलीमध्ये देखील गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी -नाल्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतीच्या कामांना वेग येणार आहे.