अमरावती – (BIG NEWS) मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यभरातील सहा विभागांत बदल्यांमध्ये कोट्यवधींचा ‘गेम’ झाला आहे. त्यामुळे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या खात्यात नेमके चालले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
मृद व जलसंधारण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीने नियुक्त्या ३० मे २०२५ रोजी करण्यात आल्या. मात्र, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागात उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ‘अ’, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांना फाटा देण्यात आला आहे. विभागनिहाय बदल्यांच्या यादीत कोण अधिकारी कुठे होते आणि कुठे नियुक्ती मिळाली, यातच सर्व काही दडले आहे. या बदली यादीवर मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांचा आशीर्वाद असल्याचे दिसून येते.
मृद व जलसंधारण विभागाने अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करताना ‘मर्जी’ सांभाळणाऱ्या काही जणांना ‘मागणी’नुसार त्याच जागेवर मुदतवाढ दिली आहे. यात राजेश बहुरिया (चंद्रपूर), जी. टी. काळकर (चंद्रपूर), एच. जी. कानडे (मुखेड) यांचा समावेश असून, विदर्भातच मुदतवाढ देण्याचा प्रकार अधिक दिसून येतो. अश्विनकुमार पवार (यवतमाळ), प्रशांत आवंदकर (चांदूर बाजार), मोहिनी धोंडे (नांदगाव खंडेश्वर) यांना खेटून असलेल्या ठिकाणी बदली मिळाली आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या ३० मे २०२५ रोजी विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांत यवतमाळ येथील ‘पराग’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याची माहिती आहे. यादी ‘ओके’ करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. बदली असो वा मुदतवाढ, ‘पराग’च्या माध्यमातूनच करण्याचे फर्मान होते. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या बदलीपात्र अधिकाऱ्यांनी मे महिन्याच्या प्रारंभीच सेटिंग केली होती.