पत्रकार कुटुंबांना वैद्यकीय खर्चात ५०% सवलत: ऐतिहासिक निर्णय!

By: Editor_Pratik

On: Sunday, June 8, 2025 8:59 AM

पत्रकार मागणी
Google News
Follow Us

उरुळी कांचन (ता. हवेली): पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यसेवेत मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन महाराज माथेफोड यांच्या विशेष प्रयत्नांमुळे, डॉक्टर वेलफेअर असोसिएशन, उरुळी कांचनने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी (आई-वडील, पत्नी आणि मुले) वैद्यकीय उपचारांमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

ही सवलत १५० हून अधिक रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असून, लवकरच ही योजना अंमलात येईल. डॉक्टर वेलफेअर असोसिएशनने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून हा निर्णय घेतला असून, पत्रकारांच्या समाजातील योगदानाला दिलेली ही एक महत्त्वपूर्ण पावती आहे. प्रा. माथेफोड यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे.

या निर्णयामुळे अनेक पत्रकार कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. पत्रकार हे समाजाचा चौथा स्तंभ मानले जातात आणि अनेकदा ते स्वतःच्या आरोग्यापेक्षा आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत आश्वासक ठरणार आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर जिल्ह्यांमध्येही अशीच योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश आखाडे, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत शितोळे, डॉ. उमा कथले, डॉ. शरद गोते, डॉ. परिमल परदेशी, डॉ. समीर ननावरे, डॉ. विजय फडतरे आणि डॉ. सुनील गांगुर्डे यांच्या हस्ते सवलतीचे पत्र उपस्थित पत्रकार सचिन सुंबे (राज्य मराठी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष), नितीन करडे (राज्य उपाध्यक्ष), भाऊसाहेब महाडिक, सहदेव खंडागळे, सुनील तुपे आणि चंद्रकांत दुंडे यांना प्रदान करण्यात आले.

प्रा. सचिन महाराज माथेफोड यांचा अभिप्राय : पुणे जिल्हाध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार परिषद, प्रा. सचिन महाराज माथेफोड यांनी या निर्णयाबद्दल बोलताना सांगितले की, “लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार, जो समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम करतो, तो आर्थिक बाबतीत नेहमीच मागे असतो. समाजाच्या हक्कासाठी लढणारा हा पत्रकार कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये अनेकदा कमी पडतो. त्यात स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी वैद्यकीय गरज पडल्यास, नेहमी इतरांच्या उपयोगी पडणाऱ्या पत्रकारांना मात्र निराशाच हाती येते.”

ते पुढे म्हणाले, “त्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना कोणापुढे हात पसरावे लागू नये म्हणून हा उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे होते. १५० हून अधिक रुग्णालये असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक पत्रकाराला आणि त्याच्या कुटुंबाला योग्य व सवलतीच्या दरात उपचार मिळतील. यासाठी त्याला आता कोणाचेही पाय धरण्याची आवश्यकता नाही.”

या उपक्रमासाठी राज्य उपाध्यक्ष नितीन करडे, विजय लोखंडे आणि केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही प्रा. माथेफोड यांनी नमूद केले. तसेच, पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन आणि वाघोली डॉक्टर असोसिएशन या संघटनांशीही चर्चा झाली असून, लवकरच त्यांच्याकडेही ही योजना लागू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. ही योजना पत्रकार बांधवांसाठी एक मोठा आधार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 23, 2026

March 22, 2026

March 22, 2026

March 22, 2026

March 21, 2026

March 21, 2026