अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू

By: Editor_Pratik

On: Monday, May 19, 2025 5:51 AM

Google News
Follow Us

अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना आज पहाटे हा अपघात झाला. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे.

अपघातातील मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर , सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19) , श्रेयस राजेंद्र सावंत (23) यांचा समावेश आहे. दोन कुटुंबातील हे लोक मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाले होते. त्याचवेळी काळाने घात केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कुटुंब मुंबई मिरा रोड भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास देवरुख येथे जात होते. भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या पुलावरुन कार थेट नदीत कोसळली. ही घटना पाच साडेपाचच्या जवळपास घडली.

या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलीसांना तातडीने कळवले. त्यानंतर कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात आणले. मात्र या अपघातातील पाच जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हालवण्यात आले आहे तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आल आहे. पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत तर मोरे मीरा-भाईंदर येथील आहेत.

घटनास्थळी मदतीकरता खेड येथील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नागरिकांनी व पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती. तातडीने कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली. या सगळ्या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही खेड पोलिसांकडून सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now