Pune Triple Murder : महिलेच्या हातावर गोंदवलंय जय भीम, पुणे तिहेरी हत्याकांड प्रकरणात एकच पुरावा; पोलिसांसमोर तपासाचं आव्हान

By: Editor_Pratik

On: Monday, May 26, 2025 8:33 AM

Google News
Follow Us

Pune Triple Murder

शिरूर (पुणे) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती हद्दीत खंडाळे माथ्याजवळील एका बंद कंपनीच्या मागे एका तरुण महिलेच्या आणि दोन चिमुकल्यांच्या अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही क्रूर तिहेरी हत्या असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० दरम्यान असून, तिच्या शेजारी दीड ते दोन आणि चार ते पाच वर्षांच्या दोन लहान मुलांचेही मृतदेह आढळले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या तिघांचा निर्घृण खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पावसामुळे मृतदेह अर्धवट जळाले. या घटनेत मृत महिलेच्या हातावर “जय भीम” गोंदलेले आढळले असून, सध्या ओळख पटवण्यास हेच एकमेव धागा आहे.

रविवारी सकाळी साडेअकरा वाजता खंडाळे गावातील पादचारी नागरिकाने दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिस पाटील सीमा खेडकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी पती आणि इतर ग्रामस्थांसोबत पाहणी केली असता मृतदेह झुडपात आढळून आले. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आले आणि पोलिस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पेट्रोलचा वास जाणवत होता. मृत महिलेच्या डोक्यावर मारहाण झाल्याचे स्पष्ट खुणा आहेत. ही हत्या करून मृतदेह निर्जन स्थळी आणून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मृतदेह इतके जळाले आहेत की ओळख पटवणे कठीण झाले आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी शोधमोहीम हाती घेतली आहे. पावसामुळे तपासात अडथळा येत आहे. महिला परिसरात भाडेकरू म्हणून राहत होती का, याचीही चौकशी सुरू आहे.

ही घटना उघडकीस आल्यावर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांना मृत महिलेच्या जवळ बिलगलेली दोन निष्पाप बालके पाहून अश्रू अनावर झाले. पोलिसांसमोर सद्यस्थितीत मृत महिलेच्या हातावरील “जय भीम” हे गोंदवलेले अक्षरच एकमेव धागा असून, तपास अधिक खोलवर नेण्यात येत आहे.

स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकानेही दुपारपासून समांतर तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल हे देखील घटनास्थळी पोहोचले असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026