Pune Crime | पुण्यात पहाटे गोळीबार; शहरात एकच खळबळ, दोघेजण अटकेत

By: Editor_Pratik

On: Monday, May 26, 2025 2:29 AM

Golibar
Google News
Follow Us

पुणे (Pune Crime) : शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सराईत गुन्हेगार रोहित माने (वय ३२, रा. लोहियानगर) आणि कासीम अन्सारी या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण केदारी, शाम गायकवाड, अश्पाक शेख आणि संतोष कांबळे हे चौघेजण पहाटे पाचच्या सुमारास मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी आरोपी दुचाकीवरून त्या परिसरात वारंवार फिरत होते. स्थानिकांनी त्यांना हटकल्यानंतर आरोपींनी रागाच्या भरात या चौघांवर गोळीबार केला. सुदैवाने गोळ्या कोणालाही लागल्या नाहीत.

घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहित माने याला ताब्यात घेतले आणि काही वेळातच कासीम अन्सारीलाही अटक करण्यात आली. दोघांकडून एक पिस्तूल व काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

रोहित माने हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आर्म्स ॲक्ट, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या गुन्हे शाखा आणि फरासखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now