“महाराष्ट्राला नटवा, पण नटवी म्हणून पुढे येऊ नका”: Kishori Pednekar यांची रूपाली चाकणकरांवर सडकून टीका

मुंबई : वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एका मुलाखतीत पेडणेकर यांनी चाकणकर यांना “चिल्लर” आणि “थिल्लर” महिला म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पेडणेकर म्हणाल्या: “महिला आयोगाच्या खुर्चीत बसून मेकअप करण्यात वेळ घालवणाऱ्या, संवेदनशून्य आणि केवळ राजकीय पक्षाच्या रबर स्टँपसारख्या वागत असलेल्या व्यक्तीला त्या पदावर बसवणं म्हणजे महिलांचा अपमान आहे. वैष्णवीसारखी घटना घडल्यानंतर सुद्धा संवेदना न दाखवणाऱ्या चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.”

पेडणेकरांनी असा सवालही केला की, “चाकणकर यांच्यासाठी शरद पवारांनी दिलेल्या संधीचा त्यांनी दुरुपयोग केला. जर त्या त्यांच्या जबाबदारीत अपयशी ठरत असतील, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही.”

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात चाकणकर यांनी निष्क्रिय भूमिका घेतल्याचा आरोप करत पेडणेकर म्हणाल्या की, “महिला आयोग केवळ आकड्यांची नोंद ठेवण्याचं काम करतंय. खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देणं, महिलांच्या बाजूने उभं राहणं हे तिथं दिसत नाही.”

त्यांनी हेही सांगितलं की, “आज महाराष्ट्र महिला अत्याचारांविरोधात लढा देत आहेत. अशा परिस्थितीत महिला आयोगात जबाबदार आणि संवेदनशील नेतृत्व असणं गरजेचं आहे. महिला आयोग हे सौंदर्यप्रदर्शनाचं स्थान नाही.”

राजकीय टीका करताना त्यांनी सांगितलं : “तुम्ही महाराष्ट्राला नटवा, पण नटवी म्हणून पुढे येऊ नका.” हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनले आहे.