हुक्का बारला पाठबळ देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई; ९० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी निलंबन; पोलीस दलाची प्रतिमा मलीन

By: Editor_Pratik

On: Friday, May 23, 2025 8:55 AM

police-cap-rep
Google News
Follow Us

पुणे : पुण्यातील काळेपडळ परिसरातील बीबीसी रुफटॉप किचन अ‍ॅण्ड बार या हुक्का पार्लरला संरक्षण देत आणि त्याबदल्यात दरमहा ३० ते ४० हजारांचा हप्ता घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शरद नवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि काळेपडळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे प्रकरण उघडकीस आले असून, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार नवले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

हॉटेल मालकाकडून घेतली ९० हजारांची लाच

बीबीसी रुफटॉप किचन अँड बार येथे हुक्का पुरवठा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. तपासात उघडकीस आले की, एप्रिल २०२५ मध्ये या हॉटेलचे मालक पार्थ अनिल वाल्हेकर यांनी शरद नवले यांच्याशी संपर्क साधून हुक्का व्यवसाय सुरू करण्याबाबत बोलणी केली होती. नवले यांनी “गुडलक” म्हणून ३० हजार आणि एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून आणखी ३० हजार, अशी एकूण ६० हजार रुपयांची रोख रक्कम १० एप्रिल रोजी स्वीकारली होती.

यानंतर १२ मे रोजी नवले यांच्याच ओळखीचे हनुमंत गायकवाड पाटील यांनी हॉटेल मालकाला फोन करून पुन्हा ३० हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. त्यामुळे नवले यांनी हॉटेलकडून एकूण ९० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद नवले यांनी हुक्का बारला बेकायदेशीरपणे संरक्षण देऊन पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचे कारण देत त्यांना निलंबित करण्यात आले. यापूर्वीही हुक्का पार्लरवर होणाऱ्या कारवाईबाबत माहिती लीक केल्याप्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदारावर कारवाई झाली होती. ही दुसरी मोठी कारवाई आहे.

पोलीस आयुक्तांचा स्पष्ट संदेश – “आता तरी सुधारा”

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वारंवार अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, आता त्यांनी अशा धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही स्पष्ट इशारा दिला आहे – “आता तरी सुधारा”. भ्रष्टाचार आणि लाचखोरी थांबवण्यासाठी पोलिस दलातच शिस्त आणण्याचा प्रयत्न या कारवाईतून दिसून येतो.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026

September 16, 2026

September 16, 2026