सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांकडून भक्तिरसपूर्ण गायन व नृत्यवंदना !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांकडून भक्तिरसपूर्ण गायन व नृत्यवंदना !

भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक भाविकांनी या महोत्सवाला उपस्थिती

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सवानिमित्ताने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी सादर केलेली नृत्यवंदना आणि गायन ही कलाकृती भक्तिरसाने भारलेली आणि ईश्वर्प्राप्तीच्या ध्यासातून साकारलेली होती. ‘कलेचा उपयोग केवळ मनोरंजनापुरता न करता ती साधनास्वरूप असू शकते’ हे या सादरीकरणांनी प्रत्यक्ष दाखवून दिले. फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक भाविकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली होती.

नृत्यवंदनेचे दिग्दर्शन संगीत विभागाच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी केले. या भक्तिमय नृत्यात कु. वैष्णवी गुरव, कु. बांधव्या श्रेष्ठी, कु. सोनाक्षी चोपदार, कु. चांदणी आसोलकर, कु. शर्वरी कानसकर, कु. आराधना घाटकर, कु. अपाला औंधकर, कु. निधी गवारे, कु. तीर्था देवघरे, कु. अंजली कानसकर, कु. मृणालिनी देवघरे, कु. मोक्षदा देशपांडे आणि कु. वैदेही सावंत यांनी सहभाग घेतला. नृत्य सादर करताना साधिकांनी गुरूचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

संगीत विभागातील साधिकांनीही आपली भक्तिभावपूर्ण संगीतसेवा सादर करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय ‘कलेचा उपयोग ईश्वरप्राप्तीसाठी’ या सिद्धांतावर कार्यरत असून साधिकांना नृत्य, गायन यांसारख्या माध्यमांतून आध्यात्मिक प्रगतीची दिशा दाखवत आहे.