सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !

गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !

 

 २३ देशांतील प्रतिनिधी • २५ हजार भाविक • १५ पावन संतपादुका • सोमनाथ ज्योतिर्लिंग

ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

    फोंडा (गोवा) : जसे कुंभमेळ्याला लाखो कोट्यवधी भाविक, संत-महंत एकत्र येतात, तसेच पहिल्यांदाच गोव्याच्या पावन भूमीवर १७ ते १९ मे कालावधीत एक दिव्य आध्यात्मिक कुंभमेळा भरतो आहे – ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !’ या महोत्सवात २३ देशांतील नागरिक आणि संत-महंत, धर्मप्रेमी हिंदू, तसेच २५ हजारांहून अधिक भाविक ४ ते ५ दिवस वास्तव्य करणार असून संतांच्या वाणीची ज्ञानगंगा, एक कोटी रामनाम जपयज्ञ, शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन, विविध संतांच्या पावन पादुका, एक हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दुर्मिळ दर्शन आणि महाधन्वंतरी ते शतचंडी यज्ञयाग या उपक्रमांचा समावेशही आहे. महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण होत आली असून लवकरच सर्वांना भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम गोव्यात पहायला मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली. ते फर्मागुडी, फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

    या वेळी महोत्सवाची सिद्धता पाहिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उद्योजक श्री. जयंत मिरिंगकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक व श्री. सुचेंद्र अग्नी उपस्थित होते. या वेळी श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले की, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सवानिमित्त होणारा हा महोत्सव म्हणजेच रामराज्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल आहे. या महोत्सवातून साधक आणि धर्मप्रेमी हिंदू देव, देश अन् धर्म रक्षणासाठी नवा संकल्प घेऊन कृतीशील होतील.

    शंखनाद महोत्सवाची जागृती : गोव्यात सर्वत्र जागृती करणारे शेकडो फ्लेक्स फलक, विविध चौकात शंखनाद करणारे भगवान श्रीकृष्णाचे कटआऊट्स, विविध मार्गांवर स्वागत कमानी, साधूसंतांची छायाचित्रांचे भव्य फलक, महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंदिराच्या आकाराची भव्य कमान आदी भक्तीमय वातावरण निर्माण करत आहेत. महोत्सवात ३८ फूट उंचीचा भव्य धर्मध्वज उभारण्यात येणार आहे.

    सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील वैशिष्ट्ये : महोत्सवाचे क्षेत्रफळ १ लाख २६ हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये पसरलेले असून त्यात २५ हजार लोकांना बसण्यासाठी वातानुकुलित मंडपव्यवस्था करण्यात आली आहे. एकावेळी ८ हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था, हजारो वाहनांसाठी १७ पार्किंग झोन, भाविकांसाठी ३५० प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासह भव्य धार्मिक ग्रंथ विक्री केंद्र, गो-कक्ष, श्रीअन्नपूर्णा कक्ष, गुरुमंदिर, ६ हजार चौरस फूटाचे शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन, १५ संतांच्या पावन पादुका कक्ष, एक हजार वर्षांपूर्वीचे सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन कक्ष असेल; तसेच महोत्सवात सुरक्षेसाठी पोलीस मनोरे, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, अनेक रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स; अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय केंद्रात १६ डॉक्टर्स, सुव्यवस्थापनासाठी प्रशासनाच्या २५ विभागांसाठी जागा, माध्यम प्रतिनिधींसाठी कक्ष, तसेच अन्य आवश्यक त्या सुविधा असणार आहेत. या महोत्सवात सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांना प्रवेशासाठी शासनमान्य ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच येतांना बॅगा आणू नयेत, अशी विनंती आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्या !