सह्याद्रि हॉस्पिटलने कर्करोग रुग्णांसाठी उभारला सहाय्यता गट…

व्हेरियन ट्रूबीमसह अत्याधुनिक किरणोत्सर्ग उपचार केले सुरू

कर्करोगामधून बरे झालेल्या रुग्णांनी नव्या कर्क-रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी घेतली प्रतिज्ञा; कर्करोगावर सर्वांगीण उपचार देण्याच्या कटिबद्धतेचा सह्याद्रि हॉस्पिटलचा पुनरुच्चार

गेल्या दशकात कर्करोगावरील उपचारांमध्ये मोठी क्रांती झाली आहे. हे उपचार आता अधिक अचूक, रुग्ण-केंद्रित व प्रगत तंत्रज्ञान आधारित झाले आहेत. स्तनाचा, फुप्फुसाचा आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग आजही मोठ्या प्रमाणात आढळतोच आहे, पण याचबरोबर पचनसंस्थेतील म्हणजेच स्वादुपिंडाचा (पॅन्क्रिया) आणि यकृताचा (लिव्हर) कर्करोग यांसारख्या निदानास कठीण असलेल्या कर्करोग प्रकारांतही वाढ दिसून आली आहे. भारतात देखील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, २०१२ ते २०२२ या कालावधीत कर्करोगाची नोंदणीकृत प्रकरणे ३६ टक्क्यांनी वाढली. २०१२ मध्ये हा आकडा १०.१ लाख इतका होता, तर २०२२ मध्ये तो १३.८ लाखांपर्यंत पोहोचला. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही ३०.३ टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक स्तरावर कर्करोगाच्या रुग्णांची संख्या विचारात घेतली असता, त्यात भारताचा क्रमांक तिसरा (१३.८ लाख रुग्ण) लागतो, तर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दुसरा क्रमांक (८.९ लाख मृत्यू) लागतो. सध्या प्रत्येकी १ लाख लोकसंख्येमागे १२१ रुग्ण असे कर्करोगाचे भारतातील प्रमाण आहे. तसेच, तरुणांपेक्षा वृद्ध व्यक्तींमध्ये कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे.

आजच्या काळातील कर्करोग उपचारांमध्ये इम्यूनोथेरपी (प्रतिकारशक्ती आधारित उपचार), टार्गेटेड थेरपीज (लक्ष केंद्रीत औषधोपचार) आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)-आधारित निदान उपकरणे यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार आराखडे तयार करणे शक्य झाले आहे. तरीदेखील, उपचारांना होणारा प्रतिकार (ट्रीटमेंट रेसिस्टन्स) आणि सतत आवश्यक असलेली सहाय्यता व आधार सेवा ही आव्हाने अजूनही रुग्ण व ऑन्कोलॉजिस्ट यांच्यासमोर कायम आहेत.

आरोग्यसेवा क्षेत्रातील या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सह्याद्रि हॉस्पिटलने ‘बीमिंग होप’ या नावाने महाराष्ट्रभर सर्वांगीण कर्करोग उपचारांना बळकटी देणाऱ्या एक आगळ्या कर्करोग रुग्ण सहाय्यता गटाची (सपोर्ट ग्रुप) घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे सह्याद्रि केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर सहवेदना, नवकल्पना आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे रुग्णांवरील उपचारांच्या संपूर्ण प्रवासात सुधारणा घडवून आणण्याची आपली बांधिलकी जपत आहे. ‘

बीमिंग होप’च्या घोषणेमुळे सह्याद्रि रुग्णालयांच्या “रुग्ण-केंद्रित” उपचार तत्त्वज्ञानाला आणखी बळ मिळाले आहे. या माध्यमातून उपचार केवळ औषधोपचारांपुरते मर्यादित न राहता रुग्णाच्या मानसिक, भावनिक आणि व्यवहारिक गरजांनाही समजून घेतात. रुग्णांना त्यांच्या उपचार प्रवासात एकमेकांशी जोडणे, समान अनुभवातून गेलेल्या इतरांसोबत संवाद साधण्याची त्यांना संधी देणे आणि समुदायाची भावना व मानसिक आधार उपलब्ध करून देणे, हे या गटाचे उद्दिष्ट आहे.

सह्याद्रि हॉस्पिटल समुहाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व वैद्यकीय संचालक डॉ. सुनील राव म्हणाले, “आज कर्करोग उपचार हे केवळ रुग्णाचा जीव वाचवण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्याच्या संपूर्ण व उपयुक्त जीवनशैलीला प्राधान्य देणे हेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. ‘बीमिंग होप’च्या माध्यमातून आम्ही रुग्णाच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक पैलूंवर भर देत आहोत. मजबूत आधार यंत्रणा उपलब्ध करून देऊन, रुग्ण केवळ वाचतीलच नव्हे तर या प्रवासात नव्या जोमाने जीवन जगू लागतील अशी आमची अपेक्षा आहे. उपचारांच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाला मानसिक व सामाजिक आधार मिळवून देण्याचा आमचा सर्वांगीण दृष्टिकोन आहे.”

नवे रुग्ण, कर्करोगामधून बरे झालेले रुग्ण, रुग्णांची काळजी घेणारे नातेवाईक आणि वैद्यकीय तज्ञ यांच्यात हा सहाय्यता गट परस्पर संवाद घडवून आणेल. या संवादातून त्यांना एकमेकांचे अनुभव समजून घेता येतील, तसेच कर्करोग उपचारांमधील शारीरिक व भावनिक अडचणी कशा हाताळायच्या याबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळेल.

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे असलेल्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विनोद गोरे म्हणाले, “कर्करोगावरील उपचारांचा प्रवास हा अनेक भावनिक व मानसिक आव्हानांनी भरलेला असतो. ‘बीमिंग होप’ हे एक असे व्यासपीठ आहे जिथे रुग्ण आपले भीतीचे क्षण आणि यशोगाथा या दोन्ही गोष्टी मोकळेपणाने शेअर करू शकतील आणि दररोज नव्या आत्मविश्वासाने जगण्यासाठी बळ मिळवतील. या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या काळजीवाहूंना उपचार प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण मानसिक आधार मिळेल. हा उपक्रम केवळ आजारावरील उपचारांशी संबंधित नाही, तर कोणीही एकटे पडू नये, यासाठी भावनात्मक सुरक्षितता देणारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे.”

रुग्णांचा उपचारांचा अनुभव अधिक सकारात्मक व परिणामकारक व्हावा यासाठी, सह्याद्रि हॉस्पिटल्सने ‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणालीचीही सुरुवात केली आहे. हे एक अत्याधुनिक किरणोत्सर्ग (रेडिओथेरपी) तंत्रज्ञान आहे. कर्करागावरील उपचारांची अचूकता आणि गती ते लक्षणीयरीत्या वाढवते. या संदर्भात डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील म्हणाले, “व्हेरियन ट्रूबीम प्रणालीमुळे कर्करोगवरील किरणोत्सर्ग उपचार देण्याच्या पद्धतीत मोठी प्रगती घडून आली आहे. फुप्फुस किंवा पोटातील ट्युमरसारख्या गाठी श्वासोच्छ्वासादरम्यान हलत असतानाही ट्रूबीम प्रणाली अचूकपणे लक्ष्य साधते. यामुळे उपचाराचा कालावधी कमी होतो आणि रुग्णाला होणारा त्रासही लक्षणीयरीत्या घटतो.”

डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जगदीश शेजुळ म्हणाले, “‘बीमिंग होप’ सहाय्यता गट आणि अत्याधुनिक ‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणाली यांचा एकत्रित उपयोग करून आम्ही आतापर्यंत २५ पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ट्रूबीम तंत्रज्ञानामुळे आम्ही ट्युमरवर एक मिलीमीटरच्या अचूकतेने उपचार करू शकतो. संवेदनशील भागांजवळ असलेल्या ट्युमरच्या बाबतीत हे फार महत्त्वाचे ठरते. अशाच एका विशेष प्रकरणात, ७५ वर्षांच्या वृद्ध रुग्णाच्या मेंदूमध्ये असलेल्या गाठीवर आम्ही या प्रणालीतून उपचार केले.

हे उपचार अचूक आणि विशिष्ट पद्धतीने झाले नसते, तर त्या रुग्णाला पक्षाघात होण्याचा मोठा धोका होता. ट्रूबीमच्या अचूकतेमुळे आणि जलद उपचार प्रक्रियेमुळे आरोग्यदायी ऊतींवर होणारा परिणाम अत्यल्प ठेवता येतो. त्यामुळे अधिक प्रभावी आणि सुरक्षित उपचार शक्य होतात. याशिवाय, ट्रूबीम तंत्रज्ञान हे रुग्णांना इंजेक्शनविना आणि शरीरावर कोणतेही व्रण न ठेवता उपचार देण्यास सक्षम आहे. साहजिकच उपचाराच्या प्रक्रियेत रुग्णाला अधिक आराम, सुरक्षितता आणि समाधान मिळते.”

‘बीमिंग होप’ सहाय्यता गट आणि ‘व्हेरियन ट्रूबीम’ प्रणाली यांच्या माध्यमातून सह्याद्रि हॉस्पिटलने पुन्हा एकदा कर्करोगच्या सर्वांगीण व रुग्ण-केंद्रित उपचारांमधील आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हे दोन्ही उपक्रम केवळ वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीपुरते मर्यादित नसून, कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या उपचार प्रवासात शारीरिक आणि मानसिक पातळीवरही संपूर्ण आधार मिळावा, यासाठी सह्याद्रिची कटिबद्धता दर्शवतात.