Crime News : धक्कादायक! अभियांत्रिकीचं शिक्षण घेणार्‍या दोन बहि‍णींवर बलात्कार; दोघांना अटक

Crime News : मध्य प्रदेशच्या भोपाळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या दोन बहि‍णींवर बलात्कार करून त्यांचे खाजगी व्हिडीओ वापरून त्यांना धमकावल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. एका महिलेने फरहान आणि त्याच्या मित्रांवर तिच्यावर तसेच तिच्या बहि‍णीवर बलात्कार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ती २०२२ मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिची फरहानबरोबर ओळख झाली. महिलेने सांगितले की फरहान तिला जाहांगिरबाद येथील त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला आणि त्यांनी शरीर संबंध ठेवले. यावेळी फरहानने याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

त्याने हा व्हिडीओ वापरून महिलेला धमकावले आणि तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला असा आरोप महिलेने केला आहे. “जर मी त्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर फरहानने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली,” असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेने पोलिसांना फरहान आणि त्याच्या मित्र तिला धमकावतानाचे संभाषण पुरावा म्हणून दिले आहे.

फरहानने महिलेच्या लहान बहिणीला लक्ष्य करण्यास सुरूवात केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. या महिलेच्या बहि‍णीने देखील वेगळा एफआयआर दाखल केला आहे. तिला फरहानच्या मित्रांनी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप आहे. दोन्ही बहि‍णींना या घटनेवेळी अंमली पदार्थ दिल्याचा आरोप आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना एका पुरूषाकडून मिळाली ज्याला महिलेने तिच्याबरोबर घडलेला अनुभव सांगितला होता. त्या पुरूषाने याबद्दल पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर महिलांचे अनेक दिवस समुपदेशन करण्यात आले. जेव्हा महिलेला तिची ओळख उघड केली जाणार नाही याची खात्री पटली, तेव्हा तिने एफआयआर दाखल केला.

यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ठिकाणांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींचे फोन देखील ताब्यात घेतले आहेत आणि पुढील तपास केला जात आहे.