पुण्यात ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला

  भ्रष्ट यंत्रणांचा सामना करत हिंदुत्वाचा विचार पुढे  न्यावा लागेल ! – श्री. माधव भांडारी

पुणे –  हिंदुत्वाला बदनाम करण्याचे षड्यंत्र वर्ष 2002 पासून चालू झाले. 26-11 च्या आक्रमणात करकरे मारले गेल्यानंतर त्या घटनेला हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. देशातील हिंदुत्ववादी विचार मोडून काढणे हा या विरोध करणाऱ्यांचा एकमेव उद्देश होता. प्रत्येक क्षेत्रात असणारी व्यवस्था वर्ष १९४७ पासून याच विचारांची असल्याने ती पालटणे सोपे नाही. तत्कालीन सरकारचा 26-11 च्या आक्रमणात सहभाग होता; मात्र गुप्तचर यंत्रणांचे अपयश असे सांगून त्यांच्यावर या आक्रमणाचे खापर फोडले गेले. या भ्रष्ट यंत्रणांचा सामना करत हिंदुत्वनिष्ठ संघटना, संस्था यांना पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. माधव भांडारी यांनी केले. 

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील कोहिनूर मंगल कार्यालयात २० एप्रिल या दिवशी पार पडला. त्या वेळी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. श्री. माधव भांडारी, ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आदी मान्यवरांसह ४००हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री सचिन घुले यांनी श्री. माधव भांडारी यांचा, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल चे अधिवक्ता श्री. दत्तात्रय देवळे यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री. निलेश लोणकर यांनी श्री. अभय वर्तक यांचा, तसेच चार्टर्ड अकाऊंटन्ट श्री. मिलिंद भातखंडे यांनी लेखक श्री. विक्रम भावे यांचा सत्कार केला.

हिंदूंच्या विरोधात कार्य करणाऱ्या शक्तींचा सामना करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना कष्ट घ्यावे लागतील !  – श्री. विक्रम भावे

हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्याला येनकेनप्रकारेण खोट्या गुन्ह्यात अडकवून यंत्रणा कशा कार्य करतात, याचे प्रत्यक्ष स्वरूप तुम्हाला या पुस्तकातून पाहायला, अनुभवायला मिळेल. मला झालेल्या यातना, झालेला छळ या पुस्तकातून मांडणे आणि सर्वांना वाचायला सांगणे, हा माझ्यासाठी अतिशय विचित्र प्रसंग आहे. हिंदूंच्या विरोधात कार्य करणाऱ्या शक्तींचा सामना करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना कष्ट घ्यावे लागतील ! ईश्वरी शक्तीचे पाठबळ आपल्याला कोणत्याही परिस्थितीत तारून नेते, हे मला या प्रसंगातून अनुभवता आले. 

राज्यातील पुरोगामित्त्वाचा बुरखा आणि जातीय राजकारण नष्ट झाल्यानंतरच हिंदुत्व येऊ शकते ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

आम्ही असे ठरवले होते की, निरपराध किंवा अपराधी – कोणताही हिंदुत्वनिष्ठ असो, त्याला आम्ही निश्चित साहाय्य करणार. संशयितांना सर्व पत्रकार भंडावून सोडतात पण निर्दोष सोडल्यानंतर एकही पत्रकार प्रश्न विचारत नाही, ही शोकांतिका आहे. विक्रम भावे यांनी लिहिलेले पुस्तक याच शोकांतिकेला वाचा फोडणारे आहे. विक्रम भावे यांना अटक झाल्यानंतर यंत्रणेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना अन् त्यांच्या कुटुंबियांना दिलेली वागणूक यंत्रणेला लाजवेल अशी आहे. 

‘मी विक्रम भावे’ या भावनेने हे पुस्तक घरोघरी पोचवा ! – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

‘गांधी हत्येनंतर थेट दाभोलकरच मारले गेले’ असा कांगावा करणे हा डाव्यांचा दहशतवाद आहे. आपण सर्वांनी हे पुस्तक वाचा, तसेच ‘मी विक्रम भावे’ या भावाने हे पुस्तक घरोघरी पोचवा असे मी आवाहन करतो. ‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या बागुलबुवाच्या बळी पडलेल्या निरपराध तरुणांचे प्रातनिधिक आत्मचरित्र म्हणजे हे पुस्तक आहे.