यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “सध्याच्या सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांची काहीच पर्वा नाही. धर्म आणि जातीच्या राजकारणाने देश आणि राज्यात परिस्थिती बिघडली आहे. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले, पण आजचे सत्ताधारी चुकीच्या धोरणांमुळे लोकांचे बळी घेत आहेत. औरंगजेबाच्या काळात जितके लोक मारले गेले नसतील, त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.”
MNS Pune : बाणेर भागातील ड्रेनेज समस्या गंभीर : मनसेचा इशारा
ते पुढे म्हणाले, “दिव्यांगांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, त्यामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांना ना कर्जमाफी मिळत आहे, ना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव. त्यामुळे शेतकरीही अडचणीत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही, केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. दिव्यांग मंत्रालयासाठी १४०० कोटींची तरतूद केली, पण त्यातील १२०० कोटी फक्त वेतनावर खर्च होत आहेत. मग उर्वरित निधीचा वापर दिव्यांग कल्याणासाठी कसा होणार?”
बच्चू कडू यांनी माध्यमांनाही प्रश्न विचारला. “औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्याने चर्चा होते, पण राज्यात सामान्य लोकांचे हाल होत आहेत, त्यावर कोणी बोलत नाही. माध्यमांनी निरर्थक गोष्टींवर भर देण्याऐवजी गरिबांच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करावे.”
तसेच ते म्हणाले, “राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते, आणि तरीही ते यावर काहीच बोलत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”
दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मागण्या
- या आंदोलनात दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेतः
- दिव्यांगांना दरमहा ६,००० रुपये मानधन मिळावे.
- प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारावे.
- दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी आणि स्वयंरोजगार धोरण लागू करावे.
- दिव्यांग उद्योजकांसाठी विशेष योजना आणावी.
- अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५% निधी राखीव ठेवावा.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि योग्य बाजारभाव मिळावा.
- २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.