Shivsena : ‘मराठी प्रथम’च्या अंमलबजावणीसाठी आठवड्याची मुदत; रिलायन्स जिओ ऑफिसला शिवसेनेचा इशारा
पुणे : रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्र ऑफिसला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत धडक देण्यात आली. हे कार्यालय मुंबई सोडून उर्वरित महाराष्ट्राचे प्रमुख कार्यालय आहे.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रिलायन्स जिओच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. श्री गोसावी आणि श्री लांडगे हे रिलायन्स जिओच्या वतीने उपस्थित होते. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ग्राहकांशी संवाद साधताना रिलायन्स जिओने केवळ मराठीतच संवाद साधला पाहिजे, असा ठाम आग्रह या चर्चेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरला.
याशिवाय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना, ग्राहक सेवा हिंदीत दिली जाणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. देशातील इतर राज्यांमध्ये स्थानिक भाषांना प्राधान्य दिले जाते, तर महाराष्ट्रात मात्र मराठीला डावलले जाते, हा अन्याय सहन केला जाणार नाही, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रिलायन्स जिओला आपल्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांनी ही मुदत मान्य केली असून, या कालावधीत ‘मराठी प्रथम’ या तत्त्वाची अंमलबजावणी न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून दणका देण्यात येईल, असा कडक इशारा देण्यात आला.
बैठकीस उपस्थित मान्यवर : शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख आबा निकम, राजेंद्र शिंदे, मकरंद पेठकर, विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे, राजेश मोरे, गोविंद निंबाळकर आणि संजय वाल्हेकर उपस्थित होते.