मिलिंग सोल्यूशन्समध्ये जागतिक स्तरावर अग्रगण्य असलेल्या निकोलस कोरेआ समुहाने भारतातील आपले कामकाज वाढविण्याचे ठरविले आहे. या समुहाने पुण्यात आपली अत्याधुनिक शाखा सुरू केली असून तीवर १.५ दशलक्ष युरो (सुमारे १३.५ कोटी रुपये) इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे.
७,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या सुविधेमुळे भारत आणि आग्नेय आशियातील ग्राहकांना उत्तम विक्री-पश्चात सेवा, स्थानिक पातळीवर जलद दुरुस्ती आणि उत्पादन सहाय्य मिळणार आहे. भारत हे वेगाने वाढणारे जागतिक उत्पादन केंद्र बनत असल्यामुळे निकोलस कोरेआ ग्रुप आपल्या धोरणांची त्यानुसार मांडणी करत आहे. पुण्यातील या नवीन कार्यालयात सुधारीत ग्राहक सेवा व वाढीव दुरुस्ती क्षमता यांचा अवलंब करण्यात येईल. त्यातून कंपनीचे महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र म्हणून भारताचे नाव प्रस्थापित होईल. येथील कामकाज सुरळीत राहण्यासाठी कंपनी स्थानिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत असून, मशीन टूल्स तंत्रज्ञानातील तज्ज्ञांचा एक मजबूत संघ उभारीत आहे. त्यामुळे भारताच्या वाढत्या उत्पादन क्षेत्राला आणखी चालना मिळेल.
निकोलस कोरेआ इंडिया एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक पराग आलेकर म्हणाले, “भारतातील प्रगतीशील पायाभूत सुविधा क्षेत्र हा आमच्या वाढीचा मुख्य घटक असून, आमच्या व्यवसायाचा ५० टक्के वाटा या क्षेत्रातून येतो. रेल्वे, बांधकाम, संरक्षण, अवकाशशास्त्र आणि ऊर्जा या क्षेत्रांत आम्ही सक्रिय आहोत. पुणे येथील नवीन सुविधा ही भारतातील आमच्या दीर्घकालीन कटिबद्धतेची सुरुवात आहे. दक्षिण आशियासाठी (चीन वगळता) विक्री-पश्चात सेवा केंद्र म्हणून भारताची निर्मिती करणे हे आमचे उद्दिष्ट आहे; जेणेकरून ग्राहकांना जलद सेवा, सुटे भाग सहज उपलब्धता आणि उत्तम पाठबळ मिळेल.”
निकोलस कोरेआ ग्रुपच्या अध्यक्षा बिबियाना निकोलस कोरेआ म्हणाल्या, “भारत ही आमच्या जागतिक रणनीतीसाठीची एक प्रमुख बाजारपेठ आहे आणि पुण्यातील नवीन सुविधा ही स्थानिक सेवा व ग्राहक सहाय्य मजबूत करण्याच्या आमच्या कटिबद्धतेची प्रतीक आहे. भारतात उत्पादन क्षेत्राचा आणि पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार होत असताना आमच्या मिलिंग सोल्यूशन्स या बदलात निश्चितच महत्त्वाची भूमिका निभावतील. भारत जागतिक उत्पादन क्षेत्रात एक शक्तिशाली केंद्र बनत आहे. अशा वेळी निकोलस कोरेआ ग्रुप प्रगत तंत्रज्ञान, शाश्वत उत्पादन आणि ग्राहकांच्या यशावर लक्ष केंद्रित करून या वाढीस पाठबळ देण्यासाठी सज्ज आहे.”
निकोलस कोरेआ ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्मेन पिंटो म्हणाल्या, “निकोलस कोरेआ ग्रुप भारतातील उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. आम्ही केवळ स्थानिक नव्हे, तर जागतिक बाजारपेठेसाठीही स्वतंत्र उत्पादन केंद्र स्थापन करण्याच्या शक्यता तपासत आहोत. सध्या आम्ही भारतभर वितरकांच्या माध्यमातून कार्यरत आहोत; मात्र भविष्यात संयुक्त उपक्रम आणि धोरणात्मक भागीदारी यांतून विकास गतीमान करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”