MNS Pune : बाणेर भागातील ड्रेनेज समस्या गंभीर : मनसेचा इशारा

MNS Pune : बाणेर भागातील ड्रेनेज समस्या गंभीर : मनसेचा इशारा

पुणे – बाणेर भागातील औंध-बाणेर लिंक रोडवरील सायकर मळा येथे मागील चार महिन्यांपासून ड्रेनेज समस्या गंभीर बनली आहे. २०० ते ३०० लोकवस्तीच्या परिसरात ड्रेनेज तुंबून मैलापाणी रहिवाश्यांच्या घरात शिरत असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : वारंवार ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावर मैलापाणी साचत असून, म्हसोबा मंदिरापर्यंत पाणी तुंबून आहे. त्यामुळे परिसरात शेवाळ साचून रस्ते निसरडे झाले आहेत. यामुळे अनेक नागरिक, विशेषतः महिला घसरून अपघातग्रस्त झाल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना आणि रहिवाश्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय, या पाण्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिक वारंवार आजारी पडत आहेत. अनेक वेळा संबंधित विभागाला कळवूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

मनसेचा प्रशासनाला इशारा : या संदर्भात रुपालीताई सायकर, शुभांगीताई सायकर, शारदाताई सायकर, कविताताई शिंदे, लहू सायकर, अतुल सायकर, लोकेश सायकर, मारुती बनकर यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली. मात्र, महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

याबाबत आज शुक्रवार, दि. २१ मार्च २०२५ रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, मा. शाखाध्यक्ष अनिल नलावडे, किशोर इंगवले, अतुल सायकर, लोकेश सायकर, मारुती बनकर व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.

४८ तासांत कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन : मनसेने प्रशासनाला ४८ तासांची मुदत दिली आहे. जर या कालावधीत ड्रेनेज दुरुस्ती झाली नाही, तर होणाऱ्या अपघातांना आणि आरोग्य धोक्याला प्रशासन जबाबदार राहील. तसेच, मनसे स्टाईल खळ्खट्याक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.