22 वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या धर्मशास्त्राविषयी हिंदूंमध्ये जागृती !
पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणाऱ्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची 19 मार्चला यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले. 22 वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रबोधनामुळे खडकवासला परिसरात धुलिवंदन आणि रंगपंचमी या सणांमध्ये शिरलेल्या अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी समस्त हिंदु जागृत झाल्याचे चित्र दिसून आले. याच्या परिणाम स्वरूप रंग खेळून पाण्यात उतरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या नगण्य होती. भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून मोहिमेला 8 वाजता आरंभ झाला. या मोहिमेसाठी पुणे शहर,भोर आळंदे वाडी,पिंपरी चिंचवड,सासवड,हडपसर येथील धर्मप्रेमी नागरिक,हिंदुत्वनिष्ठ आणि समितीचे कार्यकर्ते असे 75 हून अधिक धर्मप्रेमी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या अभियानात महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे आणि रणरागिणी शाखेच्या कु.क्रांती पेटकर हे मान्यवर उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते पाण्याची हानी होऊ नये यासाठी दरवर्षी खडकवासला जलाशयाभोवती उभे राहतात. या मोहिमेमुळे जलाशयाचे प्रदूषण रोखले जात असल्याने आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते या अभियानात सहभागी झालो. महाराष्ट्रातील नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी अशा प्रकारची अभियाने मोठ्या प्रमाणात राबवण्याची आवश्यकता आहे असे मत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक हभप दत्तात्रय चोरघे महाराज यांनी व्यक्त केले.

अश्या प्रकारे होत असलेले प्रबोधन त्यातून मिळणारा अभूतपूर्व सहभाग आणि संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद यामुळेच या वर्षीही मोहीम 100% यशस्वी झाली. मोहीम यशस्वी होण्यासाठी पाटबंधारे खाते, पोलीस प्रशासन, हितचिंतक यांनी मोलाचे सहकार्य केले. हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त केले.