द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन नागपूर

वक्फ कायदा आणि प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा यांमुळे हिंदूंना न्याय मिळण्यात मोठी अडचण ! – विष्णु शंकर जैन, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

       नागपूर –  ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा हिंदूंचा न्याय मागण्याचा अधिकार हिरावून घेतो तर वक्फ कायदा हिंदूंच्या जमिनी बळकावण्यासाठी पाशवी अधिकार देतो. वक्फ बोर्डाकडून बळकावलेल्या जमिनी परत मिळवणे शक्य नाही कारण संयुक्त संसदीय समितीनेही या संदर्भातील सुधारणा स्वीकारलेल्या नाही. त्यामुळे हे दोन्ही कायदे रद्द करणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले. जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ते बोलत होते.

देशभरातील मंदिर सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या स्वाधीन करा ! – श्री. सुनील घनवट

देशातील मंदिरांची एक इंचही भूमी कोणाला घेऊ देणार नाही. शेकडो भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये चर्च आणि दर्गे अधिग्रहित केले जात नाहीत; फक्त मंदिरेच अधिग्रहित केली जातात. जी सरकारे देवाला मानत नाहीत त्यांना मंदिर अधिग्रहित करण्याचा अधिकार नाही, असे ठाम मत हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी मांडले. उपस्थित मंदिर विश्वस्तांना उद्देशून त्यांनी म्हटले की, शेकडो वर्षांच्या आक्रमणानंतरही आपली मंदिरे अभिमानाने उभी आहेत कारण आपल्या पूर्वजांनी त्यांचे रक्षण केले. आता ही जबाबदारी आपली आहे.

 श्रीतुळजापूर देवस्थान घोटाळ्यात ८.५ कोटींचा अपहार रोखला – अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी

मंदिरे जोपासण्याचे काम भक्तांचे आहे, सरकारचे नाही. शासन अधिग्रहित श्री तुळजापूर देवस्थानातील सरकारी अधिकारी व ठेकेदारांनी केलेला ८.५ कोटी रुपयांचा घोटाळा आम्ही न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून रोखला, असे सांगून अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी यांनी सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले.

अधिवेशनातील ठराव आणि उपक्रम :

२५ ठिकाणी सामूहिक आरती, ४५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता फलक लावणे, २० मंदिरांमध्ये धर्मशिक्षण वर्ग, १५ मंदिरांमध्ये धर्मशिक्षण फ्लेक्स, सामूहिक गुढी उभारणी आणि ग्रंथालय सुरू करणे.

अधिवेशनाची सुरुवात सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर, पू. सुरेश कुलकर्णी, गुरुसेवा आश्रमचे अध्यक्ष पू. भागीरथी महाराज, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, डॉ. राजेंद्र खेडेकर आणि अधिवक्ता पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश पू. अशोक पात्रीकर यांनी वाचला.