संस्कार जोपासणे, हे खरे कर्तृत्व !
प्रस्तावना : भारताला स्वावलंबी बनविण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ योजना लागू झालेली आहे. नुकतीच मंजूर झालेली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक मुख्य योजना आहे. कौशल्य विकास ही आजमितीला संपूर्ण देशाची महत्त्वाची गरज आहे. जिल्हा प्रशासनाकडून गावागावात आणि शहरांमध्ये सुरू करण्यात येत असलेली कौशल्य विकास केंद्रे महिलांना स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या क्षेत्रात नवी दिशा दाखवत आहेत. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन महिलांनी सक्षम होणे आवश्यक आहे. कारण स्त्री भावी पिढीला, म्हणजेच राष्ट्राला घडवते, त्यातच विश्वगुरु भारताचे भविष्य दडले आहे ! मनुस्मृतीमध्ये ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ म्हणजे ज्या ठिकाणी नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात, असे म्हटले आहे. हिंदु धर्माने स्त्रीला आदिमाया शक्तीचे रूप मानले आहे. छत्रपती शिवरायांसारखे वीर पुत्र देणाऱ्या राजमाता जिजाऊ, प्राणांचेही बलिदान करून आपल्या मातृभूमीचे रक्षण करणारी वीरांगना,आपले सतीत्व सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देणारी माता सीता,सावित्री यासारखी अनमोल स्त्रीरत्ने आपल्या याच भूमीने आपल्याला दिली आहेत. मात्र स्त्रीशक्तीची हि वैभवशाली परंपरा आता लोप पावत चालली आहे. आधुनिकतेच्या आणि स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली स्त्रियांची अधोगती होत आहे. ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला जातो.महिलादिनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीच्या या वैभवशाली परंपरेला पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच महिलांचे आद्यकर्तव्य आणि त्यांचे सामाजिक दायित्व या विषयी स्त्रियांना सर्वार्थाने सक्षम बनवण्यासाठी काय करू शकतो यावर प्रकाश टाकणारा हा लेख !
कर्तृत्व म्हणजे काय : कर्तृत्व म्हणजे कर्तबगारी किंवा नैपुण्य! म्हणजेच, एखादे कार्य सक्षमतेने करण्याची क्षमता !विशिष्ट क्षेत्रात कार्यरत असणार्या महिला त्यांची क्षमता आणि अनुभव यांच्या आधारे प्रगती करून कर्तृत्वाचे ठसे उमटवतच आहे. आताच्या काळातही पूजनीय कलावतीआई, भारतरत्न लता मंगेशकर, लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, पी.टी.उषा, मेरी कोम आदी अनेक महिलांनी त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे; पण ज्या महिला गृहिणी आहेत त्यांच्या मनात ‘आपण नोकरदार महिलांपेक्षा कुठेतरी मागे आहोत किंवा कमी आहोत’, अशी भावना निर्माण होते किंवा सर्वसामान्य नोकरदार महिलांना ‘नोकरी आणि घरदार सांभाळून अन्य काही वेगळे करायला वेळच मिळत नाही’, असे वाटते. या न्यूनगंडाच्या भावनांचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. आपण जे कर्म करत आहोत किंवा आपल्याकडे जे दायित्व आहे, ते सर्वाेत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला, तर ते ‘कर्तृत्व’च आहे, हे लक्षात घ्यायला हवे. स्वामी विवेकानंद यांनीही म्हटले आहे की, ‘तुम्ही काही भव्यदिव्य करत नाही, ही तुमची चूक नाही, तर तुम्ही तुमच्या आवाक्यातीलही करत नाही, ही तुमची चूक आहे.’
महिलांचे दायित्व : कुटुंबव्यवस्था हा भारतीय सुसंस्कृत समाजाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. ‘स्त्री’ ही कुटुंबव्यवस्थेचा कणा आहे. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ अशी म्हण आहे. याचा अर्थ, ‘आई’मध्ये जगाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य असते. मातृशक्ती घरातील बाळांवर जे संस्कार करते, त्यातूनच मूल घडते. अशा सुसंस्कारित मुलांमुळेच पुढे सुसंस्कारित समाज निर्माण होतो. त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. केवळ विकास, ‘करिअर’ यांच्या बळावर महासत्ता बनता येत नाही, तर त्यासाठी चारित्र्यवान समाजाची आवश्यकता असते. हे चारित्र्य बाजारात विकत मिळत नाही, तर संस्कारांच्या पुंजीनेच ते घडवावे लागते.
आज मात्र आईचे ‘आई’पण कमी होऊन ‘मम्मी’पणा वाढत आहे; कारण मायेची उब देणार्या पदराची जागा आज जीन्स पॅण्टने घेतली आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षेत चांगले गुण मिळवणे; चांगले पैसे कमवणे; ‘सेटल’ होणे, हे आणि एवढेच मुलाचे दायित्व आहे, असे संस्कार जर मुलांवर होत असतील, तर त्यातून धर्म-राष्ट्र-समाज यांसाठी समर्पित भावाने कार्य करण्याची भावना निर्माण होणार कुठून ? स्वार्थ भावनेने प्रेरित झालेली अशी मुले पुढे जन्मदात्या आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात टाकायला मागे-पुढे पहात नाहीत. म्हणूनच पुरुषी पोशाख घालणे, धर्माचरणाला सोडचिठ्ठी देणे, मातृभाषेऐवजी परकीय इंग्रजीचा अट्टाहास धरणे, पडद्यावरील अभिनेत्रींचा आदर्श समोर ठेवून त्यांच्याप्रमाणे दिसण्या-वागण्याचा प्रयत्न करणे अशा कुप्रथा महिलांनी सोडून द्यायला हव्यात. ‘संस्कार जपणे आणि ते पुढील पिढीकडे प्रवाहित करणे’, हे खरे कर्तृत्व आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
पूर्वीच्या काळी महिला भले सुशिक्षित नव्हत्या; पण सुसंस्कारित होत्या. उत्कृष्ट व्यवस्थापनाचा त्या मूर्तीमंत उदाहरण होत्या. आज अनेक महिला औपचारिकरित्या व्यवस्थापनाचे अर्थात् ‘मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतात; पण पूर्वीच्या काळी महिला एकत्र कुटुंबपद्धतीत सर्वांचा स्वयंपाक करणे, घर सांभाळणे, मुलांना वळण लावणे, कुटुंबियांची आजारपणात काळजी घेणे, सण-उत्सव-व्रते साजरे करणे, घरी येणार्या उत्पन्नात सर्व घर चालवून बचत करणे असे सहजतेने करायच्या. त्यांच्या या कृतींमध्ये कधी बडेजाव नव्हता कि असमाधान नव्हते. त्या काळी कधी या महिलांचा त्रागा झाला असेल, तरी आज त्या महिला त्यांच्या काळाचे कौतुकच करतांना दिसतात.
आज मात्र ही कुटुंबभावना लोप पावत चालली आहे. ‘संस्कृतीची जोपासना करणे म्हणजे मागासलेपणा’, ही भावना दृढ झाल्यामुळे अनेक महिलांना त्यांचे कौटुंबिक, तसेच सामाजिक दायित्व काय आहे, याचे भान राहिलेले नाही. त्यामुळेच शहरातील रस्त्यांवर तोकडे कपडे घालून फिरणार्या महिला ‘व्यक्तीस्वातंत्र्या’चा ढोल बडवतात, तर वडीलकीच्या नात्याने कपाळावर कुंकू लावण्याचा सल्ला देणार्यांमुळे स्वतःच्या स्वातंत्र्याला नख लागल्याचा टाहो फोडतात. चित्रपटसृष्टीतील खानावळीला आदर्श मानल्यामुळे अनेक हिंदु युवती आज ‘लव्ह जिहाद’ची शिकार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच महिलांनी त्यांचे ‘महिला’ म्हणून असलेले दायित्व पार पाडण्याच्या दृष्टीने, संस्कृतीरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.
पुरुषांशी बरोबरी करण्यापेक्षा पुरुषार्थ गाजवावा ! : आज-काल पुरुषांशी बरोबरी करणे म्हणजे कर्तृत्व गाजवणे, असे समजले जाते. ‘स्त्री-पुरुष समानता’ अशा भ्रामक संकल्पनांचा प्रसार केला जातो; पण या संकल्पनांमधील फोलपणा आपण समजून घेतला पाहिजे. मुळात निसर्गानेच स्त्री आणि पुरुष अशा भिन्न प्रकृती निर्माण केल्या आहेत. प्रत्येक प्रकृतीची बलस्थाने वेगळी आहेत; पण साम्यवादी, पुरोगामी यांनी केलेल्या अपप्रचारामुळे कर्तृत्वाच्या संदर्भात एक अयोग्य मानसिकता निर्माण झाली आहे. पुरुषांशी बरोबरी करणे म्हणजे कर्तृत्व नाही, तर अंगभूत कौशल्य, कष्ट, क्षमता यांच्या बळावर उत्तम कार्य करणे म्हणजे कर्तृत्व आहे, हे लक्षात घ्यायला हवे. एका संतांनीही म्हटले आहे की, स्त्रियांनी पुरुषांशी बरोबरी करण्यापेक्षाही पुरुषार्थ गाजवावा.
गुणांची जोपासना आवश्यक : आज महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ३३ टक्के आरक्षण आहे. अनेक व्यावसायिक क्षेत्रांतही महिलांना आरक्षण आहे. अगदी बसमध्येही महिला प्रवाशांसाठी आरक्षित जागा आहे. वेगवेगळ्या स्वरूपात या आरक्षणाचा लाभ महिलांना मिळत असला, तरी त्यामुळे सर्वत्रच्या महिला सक्षम झाल्याचे चित्र मात्र आज दिसून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज एक महिला देशाच्या सर्वाेच्चपदी विराजमान आहे; पण त्याच जोडीला तळागाळातील स्थिती विपरित आहे. ग्रामीण भागात आज अनेक महिला ग्रामपंचायतीची निवडणुक जिंकून येतात. सरपंच म्हणूनही निवडल्या जातात; पण त्या केवळ नामधारी असतात. खरा गावगाडा या महिलांचे पुरुष कुटुंबीयच चालवतात, हे उघड गुपित आहे. त्यामुळे महिलांना खर्या अर्थाने कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे केवळ पद मिळवण्यापेक्षा स्वतःची क्षमता विकसित करून, पात्रता निर्माण करून, गुणांची जोपासना करून कार्य करायला हवे.
व्यावसायिक कर्मकुशलता : आज महिला अनेक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या त्या क्षेत्रात कार्य करतांना त्या भूमिकेशी एकरूप होऊन कार्य केले, तर ते कर्तृत्व गाजवण्यासारखेच आहे. उदाहरणार्थ, आज शिक्षणक्षेत्रात अनेक महिला कार्यरत आहे. या शिक्षिकांनी शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या जोडीला विद्यार्थी ‘घडवण्या’च्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. ‘लहान मुले पालकांचे ऐकत नाहीत; पण शिक्षकांचे ऐकतात’, असेही चित्र असते. अशा वेळी शिक्षिकांनी त्यांचे वर्तन सर्वार्थाने आदर्श कसे असेल, या दृष्टीने प्रयत्न केले, तर विद्यार्थी खर्या अर्थाने घडू शकतील. विद्यार्थ्यांना केवळ चांगले ‘मार्क्स’ (गुण) मिळणवण्यासाठी प्रेरित करण्यापेक्षा त्यांच्याकडून सद्गुणांची जोपासना कशी होईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शाळा-महाविद्यालयांमधून देशाची भावी पिढी घडते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांकडून प्रयत्न व्हायला हवेत. अशाच प्रकारे वैद्यकीय, अभियांत्रिकी, वकिली आदी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या महिलांनी त्यांच्या व्यावसायिक भूमिकेला प्रामाणिकपणे न्याय दिला, कर्मकुशलता साध्य केली, तर चांगल्या समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही.
समाजहिताची भूमिका घेणे : एक भूमिका घेण्याच्या दृष्टीनेही प्रत्येकाने चिंतन करायला हवे. कर्तृत्ववान आणि प्रसिद्ध व्यक्तींनी सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने अभ्यासहीन वक्तव्ये टाळणे आणि ज्वलंत विषयावर मौन न बाळगता समाज-राष्ट्र आणि धर्म हिताची बाजू परखडपणे घेणे आवश्यक आहे. अनेक कर्तृत्ववान आणि समाजात प्रसिद्धी मिळालेली व्यक्तिमत्त्वे ज्या विषयावर त्यांचा अभ्यास नाही, त्याविषयीही अधिकाराने वक्तव्य करतांना दिसतात. त्यांचे एका क्षेत्रात कर्तृत्व असले, तरी सर्वच विषयांमध्ये त्यांना अधिकार प्राप्त होतो, असे नाही. त्यामुळे आपला ज्या विषयात अभ्यास नाही, त्याविषयी अधिकाराने वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी यांनी ‘अभ्यासेविण प्रकटे, तो एक मूर्ख’, असे म्हटले आहे.
या जोडीला ज्वलंत प्रश्नावर समाज-राष्ट्र आणि धर्म हिताची भूमिकाही परखडपणे मांडणे आवश्यक आहे. आज देशभर ‘लव्ह जिहाद’चे थैमान चालले आहे; पण केवळ मोजक्याच प्रथितयश व्यक्तींनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली. आज समाजाचे ध्रुवीकरण होतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर धर्म-अधर्म, चांगले-वाईट यांच्या युद्धात ठामपणे धर्माच्या, चांगल्या गोष्टींच्या बाजूने उभे ठाकणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.
इतरांना घडवणे : कर्तबगार व्यक्तींची सेना निर्माण होण्यासाठी कर्तृत्ववान व्यक्तींनी स्वतःसारखे इतरांना घडवण्याचा प्रयत्न करायला हवा. ती एक प्रकारे समष्टी साधनाच आहे. आज महिला अनेक क्षेत्रांत अव्वल आहेत; पण त्यांच्यासारख्या दुसर्या व्यक्तींची फळी निर्माण होण्याचा अभाव आहे. आपल्याकडे असलेले कौशल्य, तसेच ज्ञान इतरांना दिल्याने समोरची व्यक्ती घडते. त्या दृष्टीने आपल्यासारखे इतरांना घडवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले, तरी चांगलेपणाची परंपरा अखंडित रहायला साहाय्य होईल.
सामाजिक दायित्व : सामाजिक दायित्व सांभाळणे, हे एकट्या-दुकट्या व्यक्तीचे कार्य नाही.वाहतुकीचे नियम पाळणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणे, रांगेत उभे रहाणे, इतरांना साहाय्य करणे, भ्रष्टाचार न करणे आणि करू न देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, सामाजिक सभ्यतांचे पालन करणे आदी प्रत्येक व्यक्तीचीच सामाजिक दायित्व आहेत. बर्याचदा ‘मला काय त्याचे’ किंवा ‘जाऊ दे’ अशा वृत्तीमुळे समाजातील दुष्प्रवृत्ती फोफावतात. त्यामुळे सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातही आवाज उठवायला हवा. कोणत्याही कारणांमुळे आपल्याकडून सामाजिक सभ्यता आणि नियम यांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
स्वसंरक्षण प्रशिक्षण : आज महिलांचे असुरक्षित जीवन पहाता प्रत्येक महिलेने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्याची आवश्यकता आहे. आज ‘बाहेर गेलेली मुलगी सुरक्षितरित्या घरी परत येईल कि नाही’, याची कुटुंबियांना काळजी असते. कोणतेही संकट सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येकानेच संकटाचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर होणे, तसेच प्रत्येकाने स्वतः स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि त्यासाठी इतरांनाही उद्युक्त करणे, हे प्रत्येक महिलेचे सामाजिक दायित्व आहे.
आदिशक्तीचा अंश : आज अनेक महिला कुटुंब सांभाळून मोठ्या पदावर पोचल्या आहेत. कौटुंबिक आणि व्यावसायिक अशी दोन्ही दायित्वे त्या चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. साधना आणि उपासना यांमुळे ही कार्यक्षमता वाढू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. स्त्रीशक्ती म्हणजे साक्षात् आदिशक्तीचा अंश आहे. या विश्वाला नियंत्रित करणारी आदिशक्ती आहे. देवासुर संग्रामामध्ये जेव्हा देवांवरही असुर वरचढ होतात, तेव्हा सर्व देव आदिशक्तीला शरण जातात. त्या वेळी आदिशक्तीच असुरांशी संहार करून देवतांना विजय प्राप्त करून देते, असे पुराणांमध्ये दाखले आहेत. अशा महाशक्तीशाली आदिशक्तीचा अंश असलेल्या ‘स्त्री’चे सामर्थ्य कमी कसे असेल ? पण स्वतःमध्ये असणार्या या देवीतत्त्वाची जागृती करण्यासाठी साधना करणे, धर्माचरण करणे अपरिहार्य आहे. आत्मशक्ती जागृत करणे, हेच खरे कर्तृत्व आणि तेच खरे सौंदर्य आहे. बाह्यसौंदर्यापेक्षाही चित्ताच्या सौंदर्याला अधिक महत्त्व आहे. आत्मशक्ती जागृत झाली की, केवळ सामाजिक नाही, तर वैश्विक दायित्व लीलया सांभाळले जाऊ शकते.
येणारा काळ हा महिलांचा असणार आहे. इराणमध्ये ‘हिजाब’च्या विरोधात सन २०२२ पासूनआंदोलन,निदर्शने झाली आहेत.इराणमधील इस्लामी सरकारने हे दडपण्याचे हरतर्हेने प्रयत्न केले; पण अखेर इराणी महिलांच्या आंदोलनांपुढे तुघलकी सरकार नमले आणि त्यांनी हिजाबसंबंधीचे नियम शिथिल केले. येणार्या काळातही महिलाच नेतृत्व करणार आहेत. त्या दृष्टीने प्रत्येकाने आपापले दायित्व समजून घेऊन ते सर्वाेत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले, तर भारत विश्वगुरु होण्याचा दिवस दूर नाही.
संकलक : कु.क्रांती पेटकर
सौजन्य – हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा
स्थानिक संपर्क क्रमांक :8983335517