लोकमान्य फेस्टिवलची भव्य सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात

पुणे लोकमान्य फेस्टिवल आणि मनो-वर्धन योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार स्पर्धाचे आयोजन सदाशिव पेठ येथील ‘लोकमान्य नगर उद्यान येथे करण्यात आले होते. ‘अखंड सूर्यनमस्कार महायज्ञ’ या अभियाना अंतर्गत ही स्पर्धा पार पडली. या अभियानाचे हे २७ वे वर्ष होते. ‘रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिना’निमित्त संस्थेच्या १४७८ साधकांनी ‘१०८ दिवसात २७ लाख सूर्यनमस्काराचा संकल्प’ पूर्ण केला. सदरील स्पर्धेत ३७५ योग साधकांनी सहभाग घेतला होता. ॲड. गणेश सातपुते यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

महिला व पुरुष मिळून एकूण १२ गटात ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटातल्या प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्हाने गौरविण्यात आले. याव्यतिरिक्त ‘सर्वोत्कृष्ट संस्थात्मक सहभागा’साठी प्रथम तीन संस्थांना सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच सूर्यनमस्काराचा प्रचार व प्रसार करणाऱ्या योगतज्ञान असणाऱ्या सांगलीच्या डॉ. हर्षला पटवर्धन यांना यंदाचा सूर्यदूत’ पुरस्कार  देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. रुईया मूकबधिर शाळेच्या विद्यार्थीचा या कार्यक्रमात विशेष सहभाग होता.

सातपुते म्हणाले की सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायामाच्याही पलीकडे जाऊन एक तेजाची, चैतन्याची उपासना अशा दृष्टीने तो केला जावा या दृष्टीने या उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो. भविष्यात आम्ही सूर्यनमस्काराच्या आंतरशालीय स्पर्धा पुण्यातील प्रत्येक शाळेत जाऊन घेणार आहोत. यातून आरोग्याविषयी जनजागृती करणार आहोत. रोज सूर्यनमस्कार करणे काळाची गरज आहे. उत्तम आरोग्यासाठी रोज सूर्यनमस्कार प्रत्येकाने करावा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार ॲड. गणेश सातपुते यांनी मानले तर मनोज पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली गोखले यांनी केले.

पटवर्धन म्हणाले की कुठलाही देवाचे दर्शन आपण त्याच्या देवळात जाऊन घेतो पण भगवान सूर्यनारायणे एकच असा देव आहे. आपण झोपलेले सुद्धा असलो तरी तो खिडकीतून डोकावून आपल्याला दर्शन देतात. त्यांच्या तेजस्वी किरणांच्या दर्शनामुळे आपण झोपेतून जागा होवून ताजे तवाने होतो. सूर्यनारायणाला स्मरण आपण श्री नमस्कार घालतो. त्यामुळे सूर्याचं तेज, ऊर्जा, चैतन्य हे सगळं आपोआपच आपल्या शरीरामध्ये संचार करते. म्हणून रोज सूर्यनमस्कार करायला हवेत.