अकोल्याचा ठेकेदार गौतमी पाटीलवर फिदा; लाखो रूपये…..

अकोले तालुक्यातील एका ठेकेदाराने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर उडवले लाखो रुपये; नागरिकांकडून चौकशीची मागणी!

जनतेच्या पैशांतून लावणीचा जल्लोष? अकोलेत ठेकेदाराच्या भ्रष्टाचारावर सवाल!

अकोले तालुक्यातील एका ठेकेदाराने सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करून लक्षवेधी चर्चा निर्माण केली आहे. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निकृष्ट कामे करून मिळवलेल्या पैशांचा गैरवापर?

सदर ठेकेदार मागील काही काळात महागड्या गाड्या, महागडे कपडे आणि ऐषारामी जीवनशैलीमुळे चर्चेत आला आहे. मात्र, त्याच्यावर सरकारी प्रकल्पांची कामे निकृष्ट दर्जाची करून शासन आणि जनतेची फसवणूक केल्याचे आरोप होत आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सलगी करून मोठ्या प्रमाणावर कंत्राटे मिळवणे आणि मिळालेल्या निधीतून अशा कार्यक्रमांवर पैसे उधळणे हे प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आले आहेत.

पत्रकारांचे पैसे बुडवणारा ठेकेदार,

संबंधित ठेकेदाराने जाहिरातींवर गुजराण करणाऱ्या पत्रकारांचे पैसे बुडवल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, स्वतःसाठी मात्र तो कोट्यवधी रुपयांच्या गाड्या घेऊन ऐषारामी जीवनशैली जगत आहे. ठेकेदाराच्या या वर्तणुकीमुळे अनेक पत्रकार नाराज झाले असून, त्यांनी यासंदर्भात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यात संतापाची लाट, ठेकेदाराच्या कामांची चौकशी करण्याची मागणी!

संपूर्ण अकोले तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरला असून, नागरिक आता संबंधित ठेकेदाराच्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

“सरकार गोरगरिबांचे, मग भ्रष्ट ठेकेदारांना अभय का?” – नागरिकांचा सवाल,

राज्यातील सत्ताधारी पक्ष गोरगरीब जनतेच्या हितासाठी काम करतो, असा दावा केला जातो. मात्र, भ्रष्ट ठेकेदारांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. “सरकार जर गोरगरिबांसाठी असेल, तर अशा भ्रष्ट ठेकेदारांची चौकशी होऊन त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे,” अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

ठेकेदाराला कोणाचे अभय?

हा ठेकेदार कोणाच्या आश्रयाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून देखील कारवाईपासून दूर आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अनेक प्रकल्पांमध्ये घोटाळा करून मिळवलेले पैसे अशा प्रकारच्या वैयक्तिक कार्यक्रमांसाठी वापरणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचे नागरिक सांगत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा,

तालुक्यातील सजग नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. “जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही, तर आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.