पैसे न दिल्यास कुटुंबियांना करू ठार, नोकराने मागितली 70 लाखाची खंडणी !

पुणे प्रहार डेस्क – हल्ली विभक्त कुटुंब पद्धती असल्याकारणाने प्रत्येक जण आपल्या घरातील कामांमध्ये मदत करण्याकरिता नोकर नेमत असतात परंतु पुणे शहरांमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आता नोकरांवर देखील विश्वास ठेवणे मुश्किल झालेले आहे. आपल्यापैकी अनेक जण आपले घरदार नोकरांच्या हवाली करून जात असतात परंतु घडलेल्या घटनेमुळे आता नोकऱ्यांवर कितपत विश्वास ठेवायचा अशी शंकादेखील घेतली जात आहे.

पुणे शहरामध्ये चक्क नोकरानेच मालकाला 60 ते 70 लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार घडलेला आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी तपास देखील करत आहेत. या घटने अंतर्गत पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने या नोकराविरोधात तक्रार नोंदवलेली असून या नोकराला अटक देखील करण्यात आलेली आहे

नितीन देवलाल सरोज असे नोकराचे नाव आहे. याबाबत सुरज बागमार यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नितीन हा वाघमारे यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत होता. नोकरी सोडल्यानंतर त्याने बागमर यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तसेच खंडणी मागून भविष्यात स्वतःचा उदरनिर्वाह करावा असा त्याने प्लॅन आखला त्याचबरोबर जर पैसे पुरवले नाही तर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आणि म्हणूनच मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू केला असता तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीची ओळख पटली.
सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील, अंमलदार शुभम देसाई, नीलेश साबळे, विठ्ठल साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.