बनावट झोमॅटो बॉय टोळी झाली जेरबंद, झोमॅटो बॉईजचे कपडे घालून करायचे घरफोडी !

पुणे प्रहार डेस्क : आपल्यापैकी अनेक जण ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून फूड ऑर्डर करत असतो. फुल ऑर्डर करण्यात अग्रगण्य मानली जाणारी कंपनी म्हणजे झोमॅटो. झोमॅटोच्या माध्यमातून आपण अर्धा एक तासांमध्ये आपल्याला हवे असलेले पदार्थ झटपट ऑनलाईन बुक करत असतो, परंतु पुणे शहरांमध्ये झोमॅटो बॉय सारखे दिसणारे कपडे घालूनच काही तरुणांच्या एका टोळीने अक्षरशः घरफोडी केल्याची घटना समोर आलेली आहे. या घटनेमुळे आता पुणेकर देखील ऑनलाइन फूड मागवायचे की नाही याचा विचार करत आहेत. ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉय जर चोर निघाला तर उगाचच पंचायत होईल असा प्रश्न देखील पुणेकरांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.

पुणे शहर पोलिसांनी आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई केलेली आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉय चे कपडे घालून पाळत ठेवून घरफोडी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलेले आहे. या टोळी कडून आतापर्यंत ८६ तोळे सोन्याचे दागिने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, १ दुचाकी वाहन, २ पिस्तूल, ५ जिवंत राऊंड, व घरफोडी करण्यासाठी वापरलेली साहित्य असा १ कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल टोळीकडून जप्त करण्यात आलेला आहे.

या घटने प्रकरणी आता पर्यंत पोलिसांनी ३ हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या घरफोडी घटनेच्या प्रकरणी गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.. या टोळीत अजून कोणा कोणाचा समावेश आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.
स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने डिलिव्हरी कंपनी zomato बॉयचे कपडे घालून घरफोडी केलेली आहे.