कुंभमेळ्याचे आयोजन : महसुलाचा स्रोत की अपव्यय?
प्रस्तावना – कुंभमेळा, ज्याला महाकुंभ असेही म्हणतात, हा भारतीय संस्कृती आणि धर्माच्या महानतेचे प्रतीक आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो आध्यात्मिक सोहळा, महासत्संग आणि सांस्कृतिक परंपरेचा भव्य आविष्कार आहे. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर होणाऱ्या या मेळ्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोट्यवधी भाविकांची उपस्थिती आणि व्यापक जनसमूहामुळे हा मेळा जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा मानला जातो.
हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांवरच प्रश्न का? – कुंभमेळ्यावर होणाऱ्या खर्चाबाबत अनेकदा टीका केली जाते. असे म्हटले जाते की, सरकार या मेळ्याच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करते, जो आरोग्य, शिक्षण आणि गरिबी निर्मूलनासाठी वापरता आला असता. विशेषतः नागा साधू आणि इतर धार्मिक परंपरांवर होणाऱ्या खर्चावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित होतात.
तथापि, इतर धर्मांच्या धार्मिक सोहळ्यांसाठीही सरकार खर्च करते, जसे की मुस्लिम बांधवांच्या हज यात्रेसाठी होणारा खर्च. तेव्हा या खर्चावर फारसा आक्षेप घेतला जात नाही. त्यामुळे केवळ हिंदूंच्या धार्मिक आयोजनांवर टीका करणे अयोग्य वाटते.
आर्थिक दृष्टिकोनातून कुंभमेळ्याचे महत्त्व! – २०१९ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुमारे ₹४,२०० कोटी खर्च केले. हा निधी मूलभूत सुविधा, सुरक्षा, स्वच्छता आणि इतर सेवांसाठी वापरण्यात आला. या मेळ्यामुळे राज्याला सुमारे ₹१.२ लाख कोटींचा आर्थिक लाभ झाला, जो पर्यटन, व्यापार आणि इतर माध्यमांतून मिळाला.
कुंभमेळ्याच्या वेळी तात्पुरते शहर उभारण्यात येते, ज्यामध्ये रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था, जलपुरवठा, वीज आणि स्वच्छतेची उत्कृष्ट व्यवस्था केली जाते. यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते आणि लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
कुंभमेळ्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा! – कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा वारसा आहे. हा मेळा पारंपरिक उद्योगांना जसे हस्तकला, वस्त्रनिर्मिती आणि स्थानिक व्यवसायांना नवसंजीवनी देतो. तसेच, भारतीय कला आणि संस्कृतीचे जागतिक स्तरावर प्रसाराचे एक प्रभावी साधन ठरतो.
कुंभमेळा : भारतीय समाजाचा अविभाज्य भाग – कुंभमेळा हा भारतीय समाजाचा एक अविभाज्य भाग आहे, जो धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. याला अपव्यय मानणे चुकीचे ठरेल. हा मेळा केवळ सांस्कृतिक वारशाचे रक्षण करत नाही तर समाजात एकता, समरसता आणि बंधुभावाची भावना वाढवतो.
कुंभ मेळ्यावर करणाऱ्यांनी हे मान्य करणे गरजेचे आहे की कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. याला अपव्यय समजण्याऐवजी भारतीय समाजाच्या प्रगतीचे आणि विकासाचे माध्यम म्हणून पाहिले गेले पाहिजे.
भक्तांसाठी सुवर्ण संधी! – अनेक वर्षांपासून सनातन संस्थेच्या वतीने कुंभ मेळ्यात विविध माध्यमातून साधना उत्तम होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत. यंदाच्या वर्षी प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात साधना सत्संग, नामसंकीर्तन फ्लेक्स प्रदर्शन इत्यादी विविध माध्यमातून व्यापक प्रसाराचे नियोजन करण्यात आलेले आहे. साधनेतील आनंद प्राप्त करण्यासाठी आणि तो इतरांनाही देण्यासाठी भक्तांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ करून घ्यावा.
संकलक : श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
संपर्क क्रमांक : 7775858387